Jay Shah on Team India Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असेल? तो किती दिवसात या पदावर येईल? कधीपासून जबाबदारी सांभाळेल? यावर BCCI चे सचिव जय शाह यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. जय शाह यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाबरोबर दिसतील. परंतु राहुल द्रविड यांच्या जाण्यानंतर कोणाचे नाव असेल हे त्यांनी अद्याप उघड केलेले नाही. द्रविडचा कार्यकाळ भारताच्या T20 विश्वचषक अंतिम सामन्याच्या दिवसापर्यंत (२९ जून) होता. त्याला टीम इंडियाने विश्वविजयी निरोप दिला. आता त्याच्या जागी माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबतच आणखी एकाचे नावही घेतले जात आहे.
मुख्य प्रशिक्षक पदासाठी माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या नावाची चर्चा आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) गंभीर आणि भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांची मुलाखत घेतली आहे. लवकरच सिलेक्टर्सचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे शाह म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना शाह म्हणाले, 'मुख्य प्रशिक्षक आणि सिलेक्टरची लवकरच नियुक्ती केली जाईल. सीएसीने दोन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करू. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर हंगामी प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत. त्यानंतर नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेपर्यंत रुजू होतील.
भारताने ११ वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद पटकावल्याबद्दल आनंद व्यक्त करताना शाह यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक केले. या सामन्यानंतर विराट, रोहित आणि रवींद्र जाडेजा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. शाह म्हणाले, 'गेल्या वर्षी रोहित कर्णधार होता आणि यावेळीही तो कर्णधार होता. गेल्या वर्षी आम्ही अंतिम सामना वगळता सर्व सामने जिंकले होते. यावेळी त्यांनी अधिक मेहनत केली आणि अखेर विजेतेपद पटकावले. इतर संघांशी तुलना केल्यास, रोहितपासून विराटपर्यंत सर्वांनीच चमकदार कामगिरी केली. अनुभवाने खूप फरक पडला."
Web Title: When will the new coach of Team India take charge Update given by BCCI Secretary Jay Shah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.