भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज आणि स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. IPL 2024 मध्ये विराट अक्षरशः धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने आयपीएल 2024 च्या हंगामात आतापर्यंत 13 सामन्यांत 66.10 च्या सरासरीने तब्बल 661 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शत तर 5 अर्धशतके झळकावली आहेत. 2024 च्या टी20 विश्वचषकातही विराट कोहलीकडून अशीच धडाकेदार खेली अपेक्षित आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट 1 जून ते 29 जून पर्यंत चालेल.
निवृत्तीच्या प्रश्नावर काय म्हणाला विराट? -टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली या वर्षी नोव्हेंबर महन्यात 36 वर्षांचा होत आहे. तो आणखी किमान 3 वर्षे तरी नक्कीच क्रिकेट खेळू शकतो. नुकतेच आरसीबीच्या एका कार्यक्रमात विराट कोहलीला निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर विराट म्हणाला, 'मला काही अर्धवट सोडून करिअर संपवायचे नाही. माझे काम पूर्ण झाल्यानंतर, मी निघून जाईन. यामुळे मी जोवर खेळत आहे, तोवर मला माझ्यातले सर्वकाही द्यायचे आहे आणि हीच गोष्ट मला पुढे जाण्यास मदत करते."
विराटचे विक्रम - विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विराटने 113 कसोटी सामन्यांमध्ये 49.16 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत, यात 29 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 ही आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 292 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.68 च्या सरासरीने 13848 धावा केल्या आहेत. यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 अशी आहे. तसेच, विराटने आतापर्यंत 117 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यांत 51.76 च्या सरासरीने भारतासाठी 4037 धावा केल्या आहेत, यात 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 122 ही आहे.