Sohail Khan on Virat Kohli : पाकिस्तानी क्रिकेटर सोहैल खान सध्या भारतात सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हे नाव अनेकांच्या लक्षातही नसेल किंवा तो कोण आहे हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. पण विराट कोहलीवर आक्षेपार्ह विधान करून हा क्रिकेटर चर्चेत आला आहे. भारताबद्दल किंवा भारतीय खेळाडूंबद्दल विधानं करून चर्चेत राहण्याची पाकिस्तानी खेळाडूंची परंपरा सोहैल खानने सुरू ठेवली आहे. भारताला दोन वर्ल्ड कप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरबद्दलही त्याने गरळ ओकली आहे.
सोहैल खानला क्रिकेटमध्ये फारसे लोक ओळखत नसतील, कारण त्याची कारकीर्दही फार मोठी नव्हती. त्याने पाकिस्तानसाठी ९ कसोटी, १३ वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेट जगतात विराट कोहलीचा मान त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे, तरीही सोहैल खानने त्याच्याबद्दल असे म्हटले की, पाकिस्तानचे जागतिक दर्जाचे खेळाडूही हे मान्य करणार नाहीत.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सर्वांना आठवत असेल, ज्यामध्ये विराटने मॅच विनिंग खेळली होती. हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर त्याने मारलेले २ षटकार सर्वांना आठवत असतील, त्यापैकी दुसरा षटकार त्याने समोरच्या दिशेने मारला. कोहलीने त्या षटकाराबद्दल सांगितले होते की, त्याच्या कारकिर्दीत असे कनेक्शन फक्त २-३ वेळा झाले आहे. हॅरिस रौफने स्वतः त्या शॉटचे अनेकवेळा कौतुक केले आहे, तो म्हणाला की तो षटकार इतर कोणीही मारू शकला नसता. पण सोहैल खानने यातही खोट काढली. तो शॉट फार कठीण नव्हता, असे सोहैल खान म्हणाला.''त्याने स्वतःसाठी जागा बनवली आणि पुढे फटका मारला. तो हार्ड लेन्थ बॉल होता, तो कव्हरच्या दिशेनेही मारू शकला असता. एका चांगल्या चेंडूवर तो चांगला शॉट होता. रोहित शर्मा त्याच्यापेक्षा चांगला आहे. विराट चांगला फलंदाज आहे, पण रोहित त्याच्यापेक्षाही सरस आहे. रोहित तांत्रिकदृष्ट्या चांगला आहे. रोहितने १०-१२ वर्षे क्रिकेटवर राज्य केले आहे''
तो पुढे म्हणाला,''२०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात कोहली माझ्याकडे आला आणि म्हणाला, नवीन खेळाडू असूनही मी खूप बोलतो. म्हणून मी त्याला म्हणालो, बेटा, तू १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत होतास तेव्हा मी पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेट खेळत होतो. तू अंडर १९ क्रिकेट खेळत होतास तेव्हा तुझा बाप ( त्याने स्वतःला म्हटले) कसोटी क्रिकेट खेळत होता.'' आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विराट कोहली आणि सोहैल खान या दोघांनी २००८ मध्ये पदार्पण केले होते.
नेटिझन्सनी पाकिस्तानी गोलंदाजाला धुतला...
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"