मुंबई : मैदानावरील पंचांच्या चुका आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात तसेच सध्या सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत देखील मैदानातील पंचांचे निर्णय चुकीचे असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच आता क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे. तसेच या बदलामुळे मात्र थर्ड अम्पायरचे काम वाढणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की, नो बॉल असल्याचेही मैदानावरील पंचांना कळत नाही. त्यामुळे कधी कधी फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागते किंवा त्यांना फ्री हिटचा फायदा मिळत नाही. त्याचबोरबर मैदानावरील पंच अन्य काही गोष्टींमध्येही चुका करताना दिसतात. या चुकांना सुधरवण्यासाठी काही दिवसातच नो बॅाल आहे की नाही हा निर्णय थर्ड अम्पायर देणार आहे. त्यामुळे पुढील सहा महिने मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये चाचणी करणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत थर्ड अम्पायर रीव्ह्यूवर आपले निर्णय देत होते किंवा मैदानावरील पंच स्टम्पिंग किंवा रन आऊटसाठी थर्ड अम्पायरची मदत घेत होते. पण आता मैदानावरील पंचांच्या चुकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे थर्ड अम्पायरवरील काम वाढणार आहे.
थर्ड अम्पायरवर आता नो बॉल तपासण्याची जबाबदारीही सोपवण्यात येणार असल्याचे समजते आहे. हा प्रयोग पहिल्यांदा भारतीय क्रिकेटमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाच्या एका नो बॉलचा फटका आरसीबीच्या संघाला बसला होता. त्यामुळे आता ही नवीन गोष्ट करण्यात येणार असल्याचे समजत आहे.