नवी दिल्ली: यंदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा मेगा लिलाव रंगणार आहे. याकडे आतापासून क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो जागेचा. दुबईमध्ये हा लिलाव पार पाडण्यास बीसीसीआय इच्छुक नसल्याची माहिती मिळाली असून, बीसीसीआय सौदी अरबच्या रियाद किंवा जेद्दाह या दोन शहरांपैकी एका शहराची निवड करण्याची शक्यता आहे.
याआधी २०२३ मध्ये दुबईत आयपीएल लिलाव पार पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराची निवड करण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. त्याचवेळी रियाद आणि जेद्दाह येथे आयपीएल लिलाव प्रक्रिया आयोजित करणे शक्य न झाल्यास पुन्हा एकदा बीसीसीआयची पावले दुबईकडे वळतील, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, रियाद आणि जेद्दह ही दोन्ही शहरे दुबईच्या तुलनेत महागडी असल्याने बीसीसीआयपुढे आव्हान सोपे नसणार. या दोन्ही शहारांमधील हॉटेल रूमची किंमत दुबईच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे.
विशेष म्हणजे, बीसीसीआयने आयपीएल लिलावासाठी आधी लंडन शहराची निवड केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये येथे कडाक्याची थंडी असते आणि यामुळे सर्व फ्रेंचाइजींना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला असता.