मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : धर्मशाला येथे पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली येथे दुसरा ट्वेंटी-20 सामना होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत.
या सामन्यापासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात विक्रमासाठी चढाओढ सुरू होणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. रोहित 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या विक्रमात रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितनं 88 डावांत 2422 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावे 65 डावांत 2369 धावा आहेत. दुसरीकडे रोहितला कोहलीच्या एका विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रमात कोहली 21 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर 17 अर्धशतकं आणि चार शतकं आहेत. या विक्रमांसह आजच्या लढतीत मालिकेत कोण आघाडी घेतं, याचीही उत्सुकता आहे.
थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स वाहिनी
कोण काय म्हणालेविराट कोहली, भारताचा कर्णधार - आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी अनेक ट्वेंटी-20 व कसोटी सामने आम्ही खेळणार आहोत. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे आणि त्यानंतरच वर्ल्ड कपसाठीचा संघ निश्चित केला जाईल.
डेव्हिड मिलर, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज - क्विंटन डी कॉकसोबत गेली अनेक वर्ष मी खेळत आहे आणि त्याच्यात नेतृत्वगुण आहेत.
हवामानाचा अंदाजमोहाली येथील वातावरण सामन्यासाठी पूरक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर पावसाचे सावट नाही.
प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.
दक्षिण अफ्रीका : क्विंटन डिकाक (कर्णधार), रेसी वान डेर दुसेन, तेंबा बावुमा, ज्युनियर डाला, ब्योर्न फोर्टिन, ब्युरेन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, एनरिच नोर्तजे, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबादा, तबरेज शम्सी आणि जॉर्ज लिंडे.