यावर्षी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार का? या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार का? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. मात्र याचं उत्तर ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एका खास बैठकीमधून मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट समिती (एसीसी) पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या विनंतीवरून ४ फेब्रुवारी रोजी बहरीन येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये आशिया चषक २०२३ च्या आयोजनासाठीच्या ठिकाणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये बीसीसीआय आणि पीसीबी आशियाई क्रिकेट संघटनेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकावरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे. हे वेळापत्रक बीसीसीआयचे सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, एसीसीने पाकिस्तानचे मत जाणून न घेता हे वेळापत्रक प्रसिद्ध केले, असा आरोप पीसीबीने केला होता.
पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्या कार्यकाळादरम्यान आशिया चषकाच्या आयोजनस्थळावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद वाढला होता. २०२३ मधील आशिया चषक स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये प्रस्तावित होती. मात्र ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या बैठकीनंतर एसीसी अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धा इतरत्र आयोजित होईल, अशी घोषणा केली होती.
या घोषणेनंतर पाकिस्ताननेही भारताला इशारा दिला होता. जर आशिया चषक स्पर्धेचं पाकिस्तानमध्ये आयोजन झालं नाही, तर पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार नाही, असा इशारा पीसीबीने दिला होता. यंदाची आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये नियोजित आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय हा बैठकीनंतरच होणार आहे. टीम इंडियाने २००८ मध्ये अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. तर पाकिस्तानचा संघ २०१६ मध्ये टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात आला होता.