नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीबाबत चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जिथे जिथे सामना होत आहे, तिथे लोक धोनी आर्मी म्हणजेच यलो जर्सीमध्ये दिसत आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी हाच माहोल दिसला.
संपूर्ण स्टेडियम ७ क्रमांकाच्या जर्सीने भरलेले दिसत होते. माजी कर्णधार मैदानावर उतरताच चाहत्यांनी 'धोनी-धोनी' असा जल्लोष सुरू केला. 'धोनी-धोनी'च्या घोषणा इतक्या जोरात होत्या की त्या गोंगाटात नाणेफेकीच्या वेळी प्रेझेंटर डॅनी मॉरिसन हिंदीत 'आराम से ... आराम से' म्हणू लागला. नाणेफेक सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जिंकली तेव्हा मॉरिसनला काहीही ऐकू आले नाही. मॉरिसन धोनीला हातवारे करून विचारू लागला, 'फलंदाजी की गोलंदाजी?' यावर धोनीने त्याला हाताने खुणावत बॅटकडे बोट दाखविले. माहीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. तो त्रास समजू शकला; कारण तो स्वतः त्यातून गेला आहे.
सामन्याच्या आधी एक व्हिडीओ व्हायरल झाला. सामना खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनी हा सीएसके संघासोबत बसमधून अरुण जेटली स्टेडियमकडे प्रवास करीत असताना, दिल्लीच्या रस्त्यांवर धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. हा व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच तिने यलो आर्मीच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले सर्व चाहते बसमागे धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक चाहते हातात सीएसकेचा झेंडा घेऊन दिसले, तर अनेक जण सेल्फीची मागणी करताना दिसले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.