मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असे म्हटले जाते. या दोघांमध्ये खुन्नस आहे आणि ते दोघे एकमेकांना चेहराही दाखवत नाहीत, असे म्हटले जाते. पण याबाबत गांगुली यांनी आज एक मोठा खुलासा केला आहे.
भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची २०१६ साली भारताच्या प्रशिकपदी निवड करण्यात आली होती. यावेळी रवी शास्त्री यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण त्यावेळी प्रशिक्षक निवडणाऱ्या बीसीसीआयच्या समितीमध्ये गांगुली होते आणि त्यांनी शास्त्रींऐवजी कुंबळेची निवड केल्याचे म्हटले जाते. पण त्याच्या पुढच्याच वर्षी कर्णधार विराट कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये मतभेद झाले. यानंतर कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोहलीच्या आग्रहामुळे रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदी विराजमान करण्यात आले, असे म्हटले जाते.
याबाबत गांगुली यांनी सांगितले की, " माझे लक्ष २२ यार्डांच्या खेळपट्टीवर असते. कारण माझ्यासाठी खेळ महत्वाचा आहे. कोणी काहीही म्हटले तरी त्याचा माझ्यावर काहीही फरक पडणार नाही."
गांगुली यांनी पुढे सांगितले की, " माझ्या आणि शास्त्री यांच्यामध्ये मतभेद आहेत, वाद आहेत, असे काहींना वाटते. पण याबाबत मला कोणतेही भाष्य करायचे नाही. या प्रश्नांवर माझ्याकडे उत्तर नाही."