सध्या आयपीएलचा हंगाम सुरु असून २८ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुजरातचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. लखनौ दुसऱ्या स्थानी, चेन्नई तिसऱ्या स्थानी, तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. आरसीबी १० गुणांसह पाचव्या स्थानी, मुंबई सहाव्या स्थानी, पंजाब सातव्या स्थानी, तर कोलकाता ८ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद नवव्या स्थानी असून दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफचा विचार केल्यास हैदराबाद आणि दिल्लीला यापुढील सर्व सामने जिंकणं अनिवार्य आहे.
१० संघामधील यंदा कोणते ४ संघ प्ले ऑफमध्ये पोहोचतील याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण दिसून येतंय. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आयपीएल २०२३च्या प्ले ऑफसाठी कोणते ४ संघ पात्र ठरतील आणि या चार संघांपैकी फक्त एकच संघ विजेतेपद मिळवेल, असे भाकीत केले आहे.
गुजरात, चेन्नई, मुंबई आणि आरसीबी हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील असा दावा हरभजन सिंगने केला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या शर्यतीत पिछाडीवर आहे, पण येत्या काही आठवड्यात ते राजस्थान रॉयल्सला मागे टाकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल, असं हरभजन सिंगने सांगितले. राजस्थान रॉयल्सचा संघ देखील शर्यतीत राहील, पण शेवटी बाकीचे संघ राजस्थानचा पराभव करतील, असं हरभजन सिंगने यावेळी सांगितले.
ऑरेंज कॅप
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आतापर्यंत ९ सामन्यात ४६६ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने ९ सामन्यांत ४२८ धावा केल्या असून, तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॉनवे आहे ज्याने १० सामन्यात ४१४ धावा केल्या आहेत. यानंतर कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत ९ सामन्यात ३६४ धावा केल्या आहेत. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने सध्या ९ सामन्यांत ३५४ धावा आहेत.
पर्पल कॅप-
मोहम्मद शमी पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने ९ सामन्यात १७ विकेट्स घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तुषार देशपांडे आहे. ज्याने १० सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर अर्शदीप सिंगचा नंबर लागतो. अर्शदीपने आतापर्यंत १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे, चावलाने ९ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. सध्या पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा मोहम्मद सिराज आहे, ज्याने ९ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. राशिदने खानने देखील ९ सामन्यात १५ विकेट घेतल्या असून तो सहाव्या क्रमांकावर आहे.