- सुनील गावसकर
भारताचा पाकिस्तानवरील विजय जितका ऐतिहासिक तितकाच विशाल ठरला. जय-पराजयाचे पारडे सतत हलते ठेवणारा हा सर्वांत बेभरवशाचा टी-२० सामना होता, वातावरणात तणाव तर होताच शिवाय चैतन्यही होते. ज्यांनी तो सामना पाहिला त्या गर्दीला आणि टीव्हीपुढील चाहत्यांना 'पैसा वसूल' सामना वाटला असावा. अव्वल दर्जाची वेगवान आणि स्विंग गोलंदाजी, फिरकीची कमाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, खेळपट्टीवरील रोमांचक धाव, दोन्हीकडील खेळाडूंची संस्मरणीय फलंदाजी हे सर्व या सामन्यात अनुभवायला मिळाले. विराटच्या फलंदाजीपेक्षा चित्तथराथक कोणतीही गोष्ट नव्हती. विशेषत: अखेरच्या टप्प्यात त्याने जे फटके मारले ते अप्रतिम होते.
आमच्यासारख्यांना मैदानावर उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले ते विराटचे फटके कधीही विसरणार नाहीत. जगभरातील चाहत्यांसाठी हे चित्र जितके आश्चर्यकारक तितकेच उत्साहवर्धक होते. अश्विनने विजयी धावा घेतली तेव्हा एमसीजीवर दोन्ही देशांच्या चाहत्यांनी सौहार्दाचे दर्शन घडविले. अनुचित घटनेला वाव नव्हता. आता टीम इंडिया पुढील सामने जिंकण्यास उत्सुक असेल. पाकविरुद्ध विजयासाठी जी भावना दाखविली ती कायम राखणे महत्त्वपूर्ण ठरेल. अशा विजयानंतर फोकस परत यायला काही वेळ लागतो. रोहित आणि राहुल यांच्यासाठी फॉर्म परत मिळविण्याची चांगली संधी असेल. पुढील काही सामन्यात दोघेही धावा काढतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
नेदरलॅन्ड्सविरुद्ध टीम इंडिया फिरकीत कोणाला संधी देतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्रतिस्पर्धी संघ दर्जेदार लेगस्पिनरपुढे अधिक खेळलेला नाही. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारताचा इरादा असेल. कारण अन्य संघांवर मानसिक वर्चस्व गाजविण्याचा तो खात्रीलायक मार्ग ठरतो. पाकिस्तानविरुद्ध सर्वांत मोठी मिळकत प्राप्त झालीच आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वांत मोठा अशा उत्कंठापूर्ण सामन्याला उपस्थित राहणे मी माझे भाग्य मानतो.
(टीसीएम)