इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल रविवारी होणार होती, परंतु पावसामुळे हा सामना आज खेळवला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान गुजरात टायटन्सचे चाहते कमी तर चेन्नई सुपर किंग्सचीच हवा पाहायला मिळाली. लांबच लांब रांगेत पिवळ्या रंगांच्या जर्सीच अधिक होत्या आणि हे सर्व आपला हिरो महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला पाहण्यासाठी आले होते आणि आजही येतील. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची ही शेवटची आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळेच आयपीएल फायनलदरम्यान धोनी त्याची निवृत्ती जाहीर करेल, असे चाहत्यांना वाटतंय. पण, त्याने तसं करू नये यासाठी चाहत्यांनी फिंगर क्रॉस केलं आहे. या संपूर्ण आयपीएलमध्ये धोनीच्या निवृत्तीच्याच चर्चा अधिक झाल्याने महान कर्णधार कपिल देव यांनी ( Kapil Dev) धक्कादायक विधान केलं आहे.
आयपीएलच्या मागील तीन हंगामात धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे आणि प्रत्येकवेळी धोनीने त्या चर्चा उडवून लावल्या. यंदा तसं होण्याची शक्यता फार कमी आहे आणि धोनीकडे आणखी एक पर्व खेळण्यासाठी काही कारण उरलेलं नाही. पण, चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीच्या निवृत्तीबाबद काहीच घोषणा किंवा संकेत दिले गेलेले नाहीत. धोनीनेही या मुद्यावर त्याचं मत मांडलेलं नाही.
या चर्चांबाबत बोलताना कपिल देव यांनी ABP News ला सांगितले की... धोनीच्या निवृत्तीची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आणि ही चर्चा करण्यापेक्षा धोनीने १५ वर्ष दिलेल्या सेवेबद्दल चाहत्यांनी त्याचे आभार मानायला हवेत. त्यामुळे फायनलनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली, तर ती चाहत्यांनी स्वीकारायला हवी.
“तो १५ वर्षांपासून आयपीएल खेळतोय. आपण फक्त धोनीबद्दलच का बोलत आहोत? त्याने त्याचे काम केले आहे. त्याच्याकडून आणखी काय हवे? त्याने आयुष्यभर खेळावे असे आपल्याला वाटते का? तसे होणार नाही. त्याऐवजी तो १५ वर्षे खेळला याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. तो पुढच्या वर्षी आयपीएल खेळत असो की नसो, त्याने त्याचा प्रभावी खेळ केला आहे. त्याने कदाचित मोठ्या धावा केल्या नसतील परंतु त्याने संघाला अंतिम फेरीत नेले आणि यावरून क्रिकेटच्या खेळात कर्णधाराचे महत्त्व काय आहे हे दिसून येते,” तो म्हणाला.