ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या १८९ धावांवर रोखलं. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं कसोटी कारकिर्दीतील १००व्या सामन्यात शतक झळकावलं.
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडला आहे. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी केली. वॉर्नरने २५४ चेंडूत २०० धावा कुटल्या. यादरम्यान, त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. वॉर्नरच्या या द्विशतकी खेळीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली असताना दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरीच नॉर्खिया (Anrich Nortje) याची चर्चाही रंगली आहे.
सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अॅनरीच नॉर्खियासोबत अपघात झाला होता. हा अपघात फारसा धोकादायक नसला तरी ज्याने पाहिला त्याला नक्कीच धक्का बसला. क्षेत्ररक्षण करत असताना अचानक स्पायडर कॅमेरा अॅनरीच नॉर्खियाला धडकला. टक्कर इतकी जोरदार होती की, अॅनरीच नॉर्खिया थेट जमिनीवर पडला. सदर घटना पाहून मैदानावर असलेला डेव्हिड वॉर्नरही पाहून थोडा घाबरला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३८६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आता दक्षिण आफ्रिकेपेक्षा १९७ धावांनी पुढे आहे. अॅलेक्स कॅरी ९ आणि ट्रेलीस हेड ४८ धावांवर नाबाद आहेत. डेव्हिड वॉर्नर २०० धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला, तर कॅमेरून ग्रीनलाही दुखापतीमुळे सामना सुरु असताना मैदान सोडावे लागले.