भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक पराभवानंतर स्टार क्रिकेटर्सच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. चाहते दोन खेळाडूंना सर्वाधिक लक्ष्य करत आहेत. एक म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा, तर दुसरा आहे विराट कोहली.रोहित शर्मा सध्या बॅटिंग बरोबरच, कर्णधार म्हणून संघ सांभाळण्यातही अपयशी ठरताना दिसत आहे. यातच, माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांना रोहित आणि विराटसंदर्भात विचारले असता, त्यांनी रोहितच्या संभाव्य निवृत्तीसंदर्भात दावा केला, तर विराटसाठी आणखी बराच वेळ असल्याचे म्हटले आहे.
सचिन तेंडुलकरच्या पदार्पणाच्या सामन्यात कर्णधार असलेले के. श्रीकांत भारताच्या पराभवामुळे चांगलेच संतापले आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर संघातील अनेक उणिवा सांगितल्या आहेत. रोहित शर्माच्या फलंदाजीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, रोहितने स्लिपमध्ये ज्याप्रकारे झेल दिला आणि नंतर पुल करताना आऊट झाला, हा चिंतेचा विषय आहे.
यावेळी, संघात बदल आणि त्याच्या पुनर्रचनेवर काम करण्याची आवश्यकता आहे का? यासंदर्भात बोलताना श्रीकांत म्हणाले, 'निश्चितच. 100 टक्के. आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. जर भारताने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली नाही, तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करू शकतो. मात्र तो एकदिवसीय सामने खेळत राहील, असे मला वाटते.
विराट कोहलीच्या निवृत्तीसंदर्भात विचारले असता श्रीकांत म्हणाले, यासंदर्भात बोलने फार घाईचे होईल, असे मला वाटते. त्याच्याकडे (कोहली) अद्याप बराच वेळ आहे. तो ऑस्ट्रेलियात पुनरागमनही करू शकतो. ऑस्ट्रेलियात त्याची कामगिरीही चांगली राहिली आहे.