>> कोमल खांबे
यंदाचा वर्ल्ड कप चांगलाच गाजला. पहिल्या सामन्यापासून पॉइंट टेबलवर अग्रस्थानी असलेल्या आणि फायनलपर्यंतच्या एकाही सामन्यात हार न पत्करलेला भारतीय संघ जगज्जेता ठरेल, अशी आशा सगळेच बाळगून होते. 'यंदाचा वर्ल्डकप आपलाच' असं स्वप्न पाहिलेल्या भारतीयांना ऑस्ट्रेलियानं धक्का दिला. स्टेडियममधील ९५ हजार भारतीयांना गप्प करण्याचा शब्द पॅट कमिन्सनं खरा करून दाखवला आणि आपल्या नाकावर टिच्चून तो वर्ल्ड कप घेऊन गेला. ही सल कायम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनाला टोचत राहील. टीम इंडियाचा हा पराभव कित्येक भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला. ते साहजिकही आहेच. कारण, Cricket is not just sport; it is an emotion for India. पण, भावनेच्या भरात आपली संस्कृती विसरून कसं चालेल?
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेटर मिशेल मार्शचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये तो वर्ल्ड कपवर पाय ठेवून बसल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधून हा फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे मार्शवर प्रचंड टीका करण्यात आली. त्याचा हा फोटो आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो तेव्हाचा फोटो शेअर करत संस्कृतीचे दाखले दिले गेले. मार्शला उन्माद आलाय का? हे यांचे संस्कार आहेत का? वर्ल्ड कप जिंकला तर मस्ती आलीये...वगैरे वगैरे आणि काय न् काय...वेस्टर्न संस्कृती कशी वाईट आणि भारतीय संस्कृती किती चांगली याच्याही पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या. वर्ल्ड कपचा अपमान करणं म्हणजे खेळाचा अपमान, असंही बोललं गेलं. याबाबत काहीच आक्षेप नाही. कारण, आपल्या संस्कृतीत बक्षिसाची, आपल्या कामाची पूजाच केली जाते. पण, मिशेल मार्शला संस्कृती शिकवणाऱ्या काही शहाण्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या नावाने जे आक्षेपार्ह मेसेज केले, त्याचं काय? भारत वर्ल्ड कप हरल्याचं दुःख किंवा ऑस्ट्रेलिया जिंकल्याचा राग म्हणून अशी पातळी सोडणं आपल्या संस्कृतीत बसतं का?
एकीकडे मार्शने वर्ल्ड कपवर पाय ठेवला म्हणून त्याला ट्रोल केलं गेलं. तर दुसरीकडे, काही आगाऊ नेटिझन्सकडून ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नी आणि मुलींना वाईट शब्दांत मेसेज केले जात होते. ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची आहे. तिने वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला सपोर्ट केला, म्हणून भारतीय चाहत्यांकडून तिला आक्षेपार्ह मेसेज पाठविण्यात आले. बरं, या मेसेजचा इतका भडीमार झाला की विनीला सोशल मीडियावर पोस्ट करत तिची बाजू मांडावी लागली. भारतीय संस्कृतीचं असं प्रदर्शन संपूर्ण जगासमोर मांडलेलं चालतं का? कोणी कोणत्या टीमला सपोर्ट करायचा, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. बरं, भारतीय संस्कृतीत पतीला परमेश्वर मानलं जातं. मग विनीने तिच्या नवऱ्याच्या टीमला सपोर्ट केला तर बिघडलं कुठे?
केवळ विनीच नाही तर ट्रेव्हिस हेडची पत्नी आणि मुलीच्या फोटोचा कमेंट बॉक्स बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांनी भरला होता. हेडची मुलगी फक्त एक वर्षाची आहे. आपल्या देशात देवीची पूजा केली जाते. मग अशा धमक्या देताना भारतीय संस्कृती कुठे जाते? असे मेसेज करून आपण काय सिद्ध करू इच्छिता? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'क्रिकेटचा देव' म्हणणारी भारतीय संस्कृती इतर खेळाडूंचा त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करायला शिकवते का? असाल तुम्ही क्रिकेटरचे मोठे चाहते...तुमच्या भावनाही दुखावल्या गेल्या असतील...पण, म्हणून व्यक्त होण्याची ही कोणती पद्धत? खेळात हार-जीत होतच असते. वर्ल्ड कप हातातून गेला म्हणून दुसऱ्या टीमच्या खेळाडूंचा अपमान करणं, ही भारतीय संस्कृती नाही. त्यांच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणं भारतीय संस्कृतीत बसत नाही. भारतीय संस्कृती इतरांचा आदर करायला शिकवते. स्वत:बरोबर इतरांचाही मानसन्मान करायला शिकवते. त्यामुळे इतरांना भारतीय संस्कृतीचे धडे देण्याआधी आपल्याला ती उमगली आहे का? याचा विचार सोशल मीडियावरून लोकांना 'ग्यान' देणाऱ्या 'महाभागां'नी करायला हवा.