IPL 2024 मध्ये विराट कोहलीने ७४१ धावा कुटून ऑरेंज कॅप नावावर केली. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्याकडून अशाच अविश्वसनीय कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, न्यूयॉर्क येथे झालेल्या तीन लढतीत विराटला अद्याप दुहेरी धावा करता आलेल्या नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट ज्या आक्रमकतेने आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसला होता, तिच आक्रमकता टीम इंडियाकडून खेळताना हरवलेली पाहायला मिलतेय. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर सलग तीन विजयांची नोंद करून Super 8 मध्ये प्रवेश मिळवला खरा, परंतु विराटचा फॉर्म ही संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंड, पाकिस्तान व अमेरिका यांच्याविरुद्ध अनुक्रमे १, ४ व ० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच विराट सलग तीन सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. अमेरिकेविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच गोल्डन डक ठरले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराटने पुरेसा सरावही केला नाही आणि त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्याला मुकावे लागले होते. भारताचा साखळी गटातील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध १५ जूनला होणआर आहे आणि त्यानंतर सुपर ८ च्या लढतीसाठी संघ बार्बाडोसमध्ये दाखल होईल. फ्लोरिडा येथील खराब हवामानामुळे भारताचे सराव सत्र रद्द करण्यात आले.
भारतीय संघ कोहलीच्या फॉर्मबद्दल कमीत कमी चिंतित आहे, कारण शिवम दुबेने किंग कोहलीच्या फॉर्मच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे. “कोहलीबद्दल बोलणारा मी कोण? जर त्याने तीन सामन्यांत धावा केल्या नाहीत, तर पुढील तीन सामन्यांत तो तीन शतकं करू शकतो आणि यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही. त्याचा खेळ आणि तो कसा खेळतो हे आम्हा सर्वांना माहीत आहे,” असे दुबे म्हणाला.
दुबे स्वत: न्यू यॉर्कच्या अवघड खेळपट्टीवर खराब पॅचमधून गेला, त्याने भारतासाठी अनुक्रमे आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त तीन धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने अमेरिकेविरुद्ध जोरदार पुनरागमन करत ३५ चेंडूत ३१ धावा केल्या. "मी माझ्या फॉर्मशी संघर्ष करत होतो आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत होतो. येथे कोणतेही दडपण नव्हते. सर्व सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांनी मला पाठिंबा दिला आणि मला सांगितले, 'हे अवघड आहे, पण तुझ्यात षटकार मारण्याची क्षमता आहे, म्हणून तू तसा खेळ कर.'