मुंबई : सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट वर्तुळात भारताचे सर्वोत्तम कर्णधार कोण, यावर चर्चा सुरु आहे. या गोष्टीवर कोणतेही आजी-माजी क्रिकेटपटू स्पष्ट मत व्यक्त करताना दिसत नाहीत. पण भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मात्र याबाबत आपले मौन सोडले आहे. धोनी, कोहली आणि रोहितपैकी कोण आहे सर्वोत्तम कर्णधार, यावर सेहवागने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
महेंद्रसिंग धोनीला सुरुवातीला मिडास राजाची उपमा देण्यात यायची. कारण धोनीने भारताला विजयामध्ये सातत्य राखण्याची सवय लावली. धोनीने भारताला २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला. त्याचबरोबर धोनीने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली, त्यानंतर भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावरही नेले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धोनीने २०११ साली भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.
सध्याच्या घडीला कोहली बरेच विजय मिळवताना दिसत आहे. परदेशातही कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने समाधानकारक कामगिरी केली आहे. पण कोहलीला मोठ्या स्पर्धांमध्ये एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. आता कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
रोहितने भारताचे नेतृत्व करताना चांगले निकाल दिले आहेत. श्रीलंकेतील निदाहास चषकात रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने आशिया चषकही जिंकला होता. कोहलीनंतर भारताचे कर्णधारपद रोहितकडे जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
सेहवाग धोनी, कोहली आणि रोहित यांच्या कर्णधारपदाबाबस बोलताना म्हणाला की, " रोहित संघाचे नेतृत्व करत असताना सर्व खेळाडूंचे मत लक्षात घेतो. त्यांच्याशी चर्चा करतो. पण कोहली मात्र खेळाडूंशी सल्ला मसलत करताना दिसत नाही. धोनी कर्णधार असताना तर आम्हाला मीडियामधून संघाच्या निगडीत गोष्टी कळत होत्या. हा या तीन कर्णधारांमधला फरक आहे."