नवी दिल्ली : पाकिस्तान हा मुस्लीमबहुल देश आहे. भारताचा तर पारंपरिक प्रतिस्पर्धी. त्यामुळे पाकिस्तानमध्ये किती हिंदू असतील आणि त्यांनी कशी वागणून दिली जात असेल, याची उत्सुकता भारतीयांना आहे. पण पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून हिंदू खेळाडू खेळले आहेत. पण पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू खेळाडू कोण? या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हाला माहिती नसेल.
ही गोष्ट आहे 1983 सालची. या वर्षी पाकिस्तानकडून पहिला हिंदू खेळाडू खेळला होता. पण या हिंदू खेळाडूला जास्त काळ खेळता आले नाही. या खेळाडूने आपल्याला पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी जास्त संधी दिली नसल्याचा आरोप केला होता. पण हा खेळाडू नेमके किती सामने खेळला आणि त्यानंतर किती हिंदू खेळाडू पाकिस्तानकडून खेळले, हे तुम्हाला माहिती आहे का...
साल 1983 साल. या वर्षी अनिल दलपत नावाचा पहिला हिंदू खेळाडू पाकिस्तानकडून खेळला होता. अनिलचे वडिल दलपत सोनावारिया, हे क्रिकेटचे चाहते होते. ते पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान हिंदूज़' नावाचा क्रिकेट क्लब चालवत होते. या क्लबमुळेच अनिल हा क्रिकेटकडे वळला आणि त्यानंतर त्याने पाकिस्तानचे प्रतिनिधीत्वही केले. अनिल हा यष्टीरक्षक होता आणि उपयुक्त फलंदाजीही करायचा.
अनिल दलपतने 1983-84 या मोसमामध्ये 67 क्रिकेटपटूंना बाद करत एक विक्रम बनवला होता. यावेळी वसिम बारी यांनी निवृत्ती घेतली होती. त्यामुळे अनिलला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली आणि पाकिस्तानकडून खेळणारा तो पहिला हिंदू खेळाडू ठरला.
2 मार्च 1984 या दिवशी अनिलने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. त्यावेळी साऱ्यांनाच त्याच्याबद्दल उत्सुकता होती. आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच कराचीमध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यावेळी पाकिस्तानपुढे इंग्लंडचे आव्हान होते.
अनिलने पाकिस्तानचे 9 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले. नऊ कसोटी सामन्यांमध्ये अनिलने एका अर्धशतकासह 167 धावा केल्या. त्याचबरोबर 22 झेल पकडत तीन स्टम्पिंग्सही केले. अनिलने 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 87 धावा केल्या. यामध्ये 13 झेल आणि दोन स्टम्पिंग्सचा समावेश होता. पण यानंतर अनिलला जास्त संधी मिळाली नाही. ही संधी इम्रान यांच्यामुळे मिळाली नसल्याचा आरोप अनिलने केला होता. पाकिस्तानकडून दिनेश कनेरिया हा अखेरचा हिंदू खेळाडू खेळला होता. दिनेश आणि अनिल हे दोघेही नातेवाईक होते.