Who Is Anshul Kamboj : रणजी करंडक स्पर्धेतील एलीट गट 'क' मधील केरळ विरुद्ध हरियाणा यांच्यातील सामना रोहतकच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात हरयाणाच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज अंशुल कंबोज याने खास पराक्रम करून 'जम्बो' विक्रमाची बरोबरी केलीये. केरळ संघाच्या पहिल्या डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स अंशुलनं आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह त्याने जम्बो अर्थात अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरलाय.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंशुल आधी कुणी केलीये अशी कामगिरी?
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंशुल आधी फक्त ३ गोलंदाजांनी अशी कामगिरी करून दाखवलीये. ज्यात अनिल कुंबळे या दिग्गज फिरकीपटूचाही समावेश आहे. अनिल कुंबळे यांनी १९९८-९९ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या दिल्लीतील फिरोजशहा कोटलाच्या (सध्याचे अरुण जेटली स्टेडियम) कसोटी सामन्यात एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. अंशुल कंबोज आधी रणजी करंडक स्पर्धेत सुभाष गुप्ते या दिग्गजाने १९५४-५५ च्या हंगामात तर देवाशीष मोहंती याने २०००-०२ या हंगामात अशी कामगिरी करून दाखवली होती.
कोण आहे अंशुल कंबोज?
हरयाणाच्या कर्नाल येथे डिसेंबर २००० मध्ये अंशुलचा जन्म झाला. १७ फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने हरयाणा संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. सैय्यद मुश्ताक अली ट्राफी २०२२-२३ च्या हंगामातून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एन्ट्री मारली होती. याच हंगामात त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसह लिस्ट ए क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०२४ च्या एसीसी इमर्जिंग टीम आशिया चषक स्पर्धेत तो भारतीय 'अ' संघाचा भाग होता. आयपीएलमधील २०२४ च्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता.
कशी राहिलीये त्याची आतापर्यंतची कारकिर्द
२०२३-२४ च्या हंगामात विजय हजारे चषक स्पर्धेत हरयाणाच्या संघाने बाजी मारली. यात अंशुल कंबोजनं मोलाचा वाटा उचलला होता. त्याने १० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ४७ विकेट्सची नोंद असून लिस्ट-ए मध्ये त्याने २३ तर टी-२० मध्ये त्याने आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत.