आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने येणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, एकीकडे दोन्ही संघांमध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चुरस सुरू असताना दुसरीकडे स्पर्धेतील खेळाडूंमध्ये एक वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ती चुरस आहे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान जिंकण्याची.
यंदाच्या वर्ल्डकपमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी शर्यतीत असलेल्या खेळाडूंची यादी आयसीसीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी खास वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटप्रेमींनाही त्यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू वाटणाऱ्या खेळाडूला मत देता येणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही आयसीसीने सांगितली असून आयसीसीच्या (https://www.icc-cricket.com/awards/player-of-the-tournament/) या लिंकवर जाऊन क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मत देऊ शकतात.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, अॅडम झॅम्पा, क्विंटन डी कॉक, मोहम्मद शमी, रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि डेरेल मिचेल यांच्या नावांचा समावेश आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीमधील ८ खेळाडूंपैकी ४ खेळाडू भारताचे आहेत. त्यामुळे यावेळच्या स्पर्धावीराचा मान भारतीय क्रिकेटपटूला मिळण्याची दाट शक्यता आहे. आता स्पर्धावीराचा मान कुणाला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कोहलीने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ३ शतकं आणि ५ अर्धशतकांसह ७११ धावा कुटून काढल्या आहेत. तर रोहित शर्मानेही धडाकेबाज फलंदाजी करत ५०० हून अधिक धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन करताना २३ बळी टिपले आहेत. तर जसप्रीत बुमराहनेही जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे.
Web Title: Who is in the race for Player of the tournament with Virat Kohli, M. Shami? Names announced, you can also vote
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.