इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम भारतात सुरू आहे. आयपीएलमध्ये जसे अनेक अनोळखी खेळाडू पुढे येतात आणि स्टार बनतात. अशातच देशांतर्गत क्रिकेटमधून बाहेर पडून आता WPLच्या माध्यमातून अनेक महिला खेळाडू आपले नाव कमवत आहेत. मुंबई इंडियन्सची फिरकीपटू सायका इशाकचे नाव लीगमध्ये अव्वल राहिले आहे. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला काल पहिला विजय मिळवून देण्यात २० वर्षीय कनिका आहुजा ( Kanika Ahuja) ने मोठी भूमिका पार पाडली. त्यामुळे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की ही कनिका कोण आहे पंजाबमधून आलेली कनिका सुरुवातीला क्रिकेटर नव्हती, पण युवराज सिंगप्रमाणे तिला स्केटिंगची खूप आवड होती. एवढेच नाही तर पंजाबमधून आलेल्या कनिकाने स्केटिंगमधील राष्ट्रीय स्पर्धेतही भाग घेतला होता. तिच्या शाळेच्या क्रिकेट प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून कनिकाने बॅट उचलली. ऑफस्पिनर कनिका पंजाबकडून प्रत्येक गट स्तरावर क्रिकेट खेळली. ज्यामध्ये अंडर-१६ आणि अंडर-१९ यांचा समावेश आहे. कनिकाने अलीकडेच पंजाबमध्ये झालेल्या आंतरराज्यीय वन डे स्पर्धेत १२२ चेंडूत ११ षटकार आणि ४५ चौकारांसह ३०५ धावांची खेळी खेळून खळबळ उडवून दिली. आरसीबीने तिला ३५ लाख रुपये देऊन WPL लिलावात समाविष्ट केले. यूपी वॉरियर्सच्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचे अव्वल ४ फलंदाज अवघ्या ६० धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. यानंतर कनिका मैदानात उतरली आणि रिचा घोषसोबत ५व्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करून आरसीबीला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. कनिकाने ३० चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. रिचाने ३२ चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकारासह ३१ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. अशाप्रकारे आरसीबीच्या पहिल्या विजयात कनिकाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"