Who is Mayank Yadav, IPL 2024 LSG vs PBKS: पंजाब विरूद्धच्या सामन्यात लखनौच्या संघाने घरच्या मैदानावर २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने अर्धशतकी खेळी केली, तर हंगामी कर्णधार निकोलस पूरन आणि कृणाल पांड्यानेही दमदार फटकेबाजी करत संघाला १९९ धावांपर्यंत नेले. २०० धावांच्या पाठलाग करताना पंजाब संघाची गाडी १०व्या षटकापर्यंत रूळावर होती. पण नंतर एका नवख्या खेळाडूने पंजाबची वरची फळी बाद करत संघाला दणका दिला. त्यानंतर मात्र पंजाबला सावरता आले नाही. वेगवान मारा करणाऱ्या या खेळाडूचे नाव म्हणजे, मयंक यादव. त्याने आपल्या पदापर्णाच्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकत ( fastest ball of IPL 2024 ) साऱ्यांना अवाक् केले. त्याशिवाय पहिल्याच सामन्यात सामनावीराचा किताबदेखील पटकावला. जाणून घेऊया कोण आहे मयंक यादव?
IPL हंगामातील सर्वात वेगवान गोलंदाज मयंक यादव कोण?
२१ वर्षीय मयंक यादवने आपल्या पदापर्णाच्या सामन्यात साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या चार षटकांत सरासरी १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या २४ चेंडूंपैकी तब्बल ९ चेंडू हे १५० किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने टाकलेले होते. त्यात सर्वात वेगवान चेंडू हा १५५.८ किमी प्रति तास इतका होता. यंदाच्या IPL मधील हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. हा चेंडू मयंकने पंजाबचा कर्णधार शिखर धवनला टाकला होता. मयंक यादव हा दिल्लीचा असून दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेला आहे. त्याने आतापर्यंत १० टी२० मध्ये १२ बळी तर १७ प्रथम श्रेणी सामन्यात ३४ विकेट्स घेतल्या आहेत. मयंकला लखनौने केवळ २० लाखांच्या बोलीवर विकत घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिखर धवन ज्या अकादमीतून क्रिकेट शिकला आहे, त्याच दिल्लीच्या सोनेट ( Sonnet Academy) अकॅडमीतून मयंक तावून सुलाखून निघाला आहे.
मयंक यादवने केली पंजाबची दैना
मयंकने केवळ वेगवान गोलंदाजीच केली नाही, तर विकेट्सही काढल्या. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळेच पंजाब एक्स्प्रेस रूळावरून घसरली. २०० धावांचा पाठलाग करताना पंजाब ११.३ षटकापर्यंत बिनबाद १०२ धावांवर होता. धवन आणि बेअरस्टो तुफानी खेळ करत होते. पण मयंक यादवने सामन्याची दिशा बदलून टाकली. त्याने ४ षटके टाकून २७ धावांत ३ बळी घेतले. सर्वात आधी त्याने जॉनी बेअरस्टोला आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये बाद केले. आपल्या दुसऱ्या षटकात त्याने प्रभसिमरन सिंगला माघारी पाठवले तर आपल्या तिसऱ्या षटकात त्याने जितेश शर्माला तंबूत धाडले.
Web Title: Who is Mayank Yadav 21-year-old Indian pacer who bowled fastest ball of IPL 2024 at 155.8kph LSG vs PBKS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.