Muhammad Waseem World Record: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हटलं की अनेक नावे चाहत्यांच्या तोंडावर येतात. काही चाहते युवराज सिंगचं नाव घेतात, काही चाहत्यांना युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची आठवण होते तर काहींच्या तोंडावर मुंबईकर हिटमॅन रोहित शर्माचं नाव येतंय. पण या साऱ्यांना एक नवखा खेळाडू पुरून उरला आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने संघाला अनेक चांगले विक्रम करून दिले आहेतच. पण त्यासोबतच त्याने वैयक्तिक स्तरावर एक असा विक्रम करून दाखवला आहे, जो भल्याभल्या स्टार फलंदाजांना जमलेला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी उंची यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीमने गाठली आहे, ती उंची इतर कोणीच गाठू शकलेले नाही. रविवारी शारजाहमध्ये युएईचा सामना अफगाणिस्तानशी झाला, तेव्हा वसीमने षटकार मारण्याचा विश्वविक्रम केल्यामुळे त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कोरले गेले. त्याने ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांसारख्या मोठ्या फलंदाजांचा विक्रम मोडीत काढला. एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा वसीम हा पहिला खेळाडू ठरला. २९ वर्षीय वसीमला हा पराक्रम करण्यासाठी सामना सुरू होण्याआधी दोन षटकारांची गरज होती. अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी२० मध्ये त्याने एकूण ३ षटकार खेचले आणि मोठा विक्रम केला. वसीमने एका वर्षात एकूण ४७ आंतरराष्ट्रीय सामन्यात १०१ षटकार मारले.
एका वर्षात (जानेवारी ते डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार-
मुहम्मद वसीम - 2023 - १०१ षटकाररोहित शर्मा - 2023 - ८० षटकाररोहित शर्मा - 2019 - ७८ षटकाररोहित शर्मा - 2018 - ७४ षटकारसूर्यकुमार यादव - 2022 - ७४ षटकार
दरम्यान, या सामन्यात यूएईने अफगाणिस्तानचा ११ धावांनी पराभव केला. या विजयासह यूएईने टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील अंतिम टी२० सामना २ जानेवारीला होणार आहे.