मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण?

Saurabh Netravalkar Mumbai India, T20 World Cup 2024 USA vs PAK: मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अंडर-19 वर्ल्डकरमध्ये भारताकडून खेळला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:45 AM2024-06-07T11:45:10+5:302024-06-07T11:51:36+5:30

whatsapp join usJoin us
Who is Saurabh Netravalkar bowled super over vs Pakistan played u19 WC for Team India Mumbai Marathi | मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण?

मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Saurabh Netravalkar Mumbai India, T20 World Cup 2024 USA vs PAK: T20 क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे असे म्हटले जाते. क्रिकेटच्या या प्रकारात बलाढ्य संघदेखील कधीकधी पराभूत होतात. २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला झिम्बाब्वेने पराभूत केले होते. तर दुसऱ्या एका वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या संघाला नेदरलँड्सने पराभवाची धूळ चारली होती. पाकिस्तानसोबत मात्र आता हा धक्क्यांचा खेळ सवयीचाच होऊ लागल्याचे दिसत आहे. २०२२च्या टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला झिम्बाब्वेने १ धावेने पराभूत केले होते. त्यानंतर यंदा सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानला चक्क अमेरिकेच्या संघाने पराभूत केले. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे, मूळचा भारतीय असलेल्या मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला. निर्णायक सुपर ओव्हरमध्ये त्याने अमेरिकेला ५ धावांनी विजय मिळवून दिला.

असा रंगला सामना

यजमान अमेरिकेच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. बाबर आझमच्या ४४, शादाब खानच्या ४० आणि शाहीन आफ्रिदीच्या नाबाद २३ धावांच्या बळावर पाकिस्तानने ७ बाद १५९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने ५०, आरोन जोन्सने नाबाद ३६ आणि अँड्रियस गौसने ३५ धावा करत सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत १८ धावा केल्या. १९ धावांचा बचाव करताना सौरभ नेत्रावळकरने पाकिस्तानला केवळ १३ धावाच करू दिल्या आणि संघाला ५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

कोण आहे मुंबईकर मॅचविनर सौरभ नेत्रावळकर?

३२ वर्षीय सौरभ हा मुळचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ ला मुंबईत झाला. २००८-०९ मध्ये कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत ३० बळी घेतले. त्यामुळे २०१० च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

U19 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी, तरीही...

न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१०च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांसारख्या बड्या खेळाडूंसोबत सौरभही टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीत स्पर्धेबाहेर गेला. सौरभला सहा सामन्यांत ९ विकेट्स घेता आल्या. २५ धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती आणि इकॉनॉमी रेटदेखील ३.११ होता. असे असूनही, सौरभला टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर स्पर्धांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण त्याला संधी मिळालीच नाही. अखेर तो अमेरिकेत निघून गेला आणि सध्या तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. काही काळ तो अमेरिकन संघाचा कर्णधारही होता. राहिला आहे.

अमेरिकेच्या संघाकडून सौरभची कारकिर्द

सौरभच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आत्तापर्यंत अमेरिकेसाठी ४८ एकदिवसीय आणि २९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७८ आणि टी-20मध्ये २९ विकेट्स आहेत. एकदिवसीयमध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ३२ धावांत पाच विकेट्स आहे, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये १२ धावांत पाच विकेट ही आहे. त्याने ८० लिस्ट-ए सामन्यांमध्ये ११७ विकेट्स घेतल्या आहेत. एकूण लीग आणि आंतरराष्ट्रीय T20 यासह त्याच्या नावावर २९ सामने आहेत, ज्यात त्याने २९ विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: Who is Saurabh Netravalkar bowled super over vs Pakistan played u19 WC for Team India Mumbai Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.