कोलकाता - भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर मुलाखतीसाठी दबाव आणणाऱ्या एका पत्रकाराने धमकी दिल्याचा दावा करत वृद्धिमान साहाने खळबळ उडवून दिली होती. साहाने या पत्रकाराचे नाव अद्याप सांगितलेले नाही. दरम्यान, बीसीसीआयने कितीही दबाव आणला तरी यापुढेही त्या पत्रकाराचं नाव जाहीर करणार नाही, असे वृद्धिमान साहाने स्पष्ट केले आहे.
पत्रकाराने धमकावल्याचा दावा वृद्धिमान साहाने केल्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी केली आहे. या तपासामध्ये पत्रकाराच्या नावाचाही समावेश असेल. मात्र वृद्धिमान साहाने त्या पत्रकाराचं नाव जाहीर न करण्याची भूमिका घेतल्याने यावरून वाद अधिकच चिधळण्याची शक्यता आहे. चौकशीमध्ये बीसीसीआय वृद्धिमान साहाला व्हॉट्सअॅपवरून धमकी देणाऱ्या पत्रकाराचं नाव विचारू शकते.
दरम्यान, साहाने सांगितले की, मी त्या पत्रकाराच्या नावाचा उलगडा करणार नाही. बीसीसीआयने माझ्याशी अद्याप चर्चा केलेली नाही. जर त्यांनी मला त्या पत्रकाराचं नाव विचारलं तर मी सांगेन की, कुणाचंही करिअर उद्ध्वस्त करण्याचा किंवा त्याला कमीपणा देण्याचा माझा हेतू नाही. त्यामुळेच ट्विटमध्ये मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. प्रसारमाध्यमांमध्ये अशी काही लोकं आहेत जी अशाप्राकारचं काम करतात, हे दाखवून देणं हाच माझ्या ट्विटचा हेतू होता.
वृद्धिमान साहाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हॉट्सअॅप मेसेजचा एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. तसेच पत्रकारितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाच्या या ट्विटनंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह यांनी त्याला पाठिंबा दिला होता.