Vaibhav Arora, IPL 2022 CSK vs PBKS Live: पंजाब किंग्जने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत सामन्यात प्रथम फलंदाजी करून १८० धावांपर्यंत मजल मारली आणि CSKला १८१ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची अवस्था खूपच वाईट झाली. चेन्नईचा निम्मा संघ ३६ धावांमध्ये तंबूत परतला. CSKला दणका देण्यात मोठा वाटा नवखा गोलंदाज वैभव अरोराने उचलला.
कगिसो रबाडाने ऋतुराज गायकवाडला स्वस्तात बाद केले. त्यानंतर वैभव अरोराने चांगल्या लयीत असलेल्या रॉबिन उथप्पाला माघारी पाठवलं आणि त्यानंतर लगेचच मोईन अलीला देखील शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे चेन्नईची अवस्था फारच वाईट झाली. अर्शदीप सिंग आणि ओडियन स्मिथ या दोघांनीही चांगली गोलंदाजी करत रविंद्र जाडेजा आणि अंबाती रायुडूला माघारी पाठवलं. त्यामुळे चेन्नईची अवस्था ७ षटकात ५ बाद ३६ धावा अशी झाली होती.
चेन्नईची वाट लावणारा वैभव अरोरा कोण?
२४ वर्षीय वेगवान गोलंदाज वैभव अरोरा हा हिमाचल प्रदेशचा क्रिकेटपटू आहे. त्याने आतापर्यंत १२ टी२० सामने खेळला आहे. २५च्या सरासरीने त्याने १२ बळी घेतले आहेत. १६ धावांत ३ बळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. विजय हजारे स्पर्धेत त्याने हॅटट्रिक घेतली होती. तसेच त्याने ९ फर्स्ट क्लास मॅचमध्ये ३० विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी त्याला कोलकाता संघाने खेळण्याची संधी दिली नाही. पण यंदा पंजाब संघाने त्याला लिलावात २ कोटी रुपयांना विकत घेतले.