Virat Kohli, Shubman Gill Shreyas Iyer: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला. यामुळे कसोटी संघात आमूलाग्र बदलाची जोरदार मागणी होऊ लागली. भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडीज दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील डब्ल्यूटीसी टप्पादेखील याच मालिकेने सुरू होणार. २०२५ला फायनल खेळली जाईल. तोपर्यंत भारतीय संघातील अर्धे खेळाडू हे वयाची पस्तिशी ओलांडून गेलेले असतील. त्यामुळे बीसीसीआयपुढे या सर्व चेहऱ्यांचा पर्याय शोधणे क्रमप्राप्त झाले आहे.
रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन हे ३८ वर्षाचे, तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे ३७ वर्षांचे झालेले असतील. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी ३६ वर्षे वय पार केलेले असतील आणि मोहम्मद शमी ३४ वर्षांचा होईल. याच कारणास्तव बीसीसीआयला या सर्व चेहऱ्यांचा पर्याय शोधणे क्रमप्राप्त झाले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत सर्वात महत्त्वाची जागा ही चौथ्या क्रमांकाची असते. सध्या या जागेवर विराट कोहली खेळतो. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर याच स्थानावर फलंदाजी करायचा. सचिननंतर विराटने दमदार कामगिरी केली. आजच्याच दिवशी २० जून २०११ला विंडीजविरूद्ध जमैका कसोटीत पदार्पण करणारा विराट ३४ वर्षांचा झाला. कोहलीनंतर या जागेवर कोण खेळणार? सध्या टीम इंडियात श्रेयस अय्यर हा पर्याय दिसतो. सलामीवीर शुभमन गिलचा फलंदाजी क्रम बदलला जाण्याची शक्यता आहे.
दहा हजारी बनणार?
विराट कोहली लवकरच कसोटीत लक्ष्मणला मागे टाकून भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन, राहुल आणि सुनील गावसकर यांच्यानंतरचा चौथा फलंदाज बनू शकतो. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पोहचण्यासाठी १,५२१ धावांची गरज आहे. या धावा केल्यानंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होईल. विराट ही कामगिरी या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये करू शकतो.
विराट कोहली २०२५पर्यंत खेळेल. मात्र, त्यानंतर भारताकडे काय योजना आहे? विराट कोहलीने २०१३मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सचिन तेंडुलकरची जागा घेतली होती. त्याआधी त्याने पाचव्या क्रमांकावर भरपूर धावा केल्या होत्या. आता स्थिती वेगळी आहे. कोहलीनंंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा युवा फलंदाज नाही.
अय्यरला दुखापतींचे ग्रहण
इएसपीएन क्रिकइन्फोनुसार, विराट कोहलीचा पर्याय म्हणून श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, अय्यरला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. त्याने नुकतीच पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. तो डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.
गिल चौथ्या स्थानावर खेळणार!
संघ व्यवस्थापनातील काही लोक शुभमन गिलला कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळविण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे शुभमन गिल वेस्ट इंडीज दौऱ्यावर मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो. याचबरोबर विराट कोहलीला याबाबत विचारणा करण्यात येईल. विराट झटपट क्रिकेटमधील वर्कलोड मर्यादित ठेवून कसोटी कारकीर्द मोठी करू इच्छितो की नाही, हे जाणून घेतले जाईल.
Web Title: Who is Virat Kohli substitute in Tests More responsibility on Shreyas Iyer, Shubman Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.