Join us  

कसोटी क्रिकेटमध्ये कधीही बाद न झालेला एकमेव सलामीवीर कोण?

जगभरातील दिग्गज सलामी फलंदाजांच्या नावावर खंडीभर विक्रम असले, सर्वात सफल फलंदाजांमध्ये त्यांची गणना होत असली तरी इंग्लंडच्या अँडी लॉईडच्या नावावर दोन असे अनोखे विक्रम आहेत जे इतर कुणाच्याच नावावर नाहीत आणि भविष्यातही आणखी कुणाच्या नावावर ते लागण्याची शक्यता नाही. अशा विक्रमांचा धनी असलेला हा खेळाडू आज 5 नोव्हेंबर रोजी एकसष्टी साजरी करतोय. त्यानिमित्ताने......

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:18 PM

Open in App

ललित झांबरे 

मुंबई : कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीविरांची नावे आठवून पहा... सुनील गावसकर, लेन हटन, हरबर्ट सट्क्लिफ, जॅक हॉब्ज, गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, जेफ बॉयकॉट, मार्क टेलर, जयसूर्या, गॅरी कर्स्टन...ही यादी कितीही वाढवली तरी त्यात तुम्हाला अँडी लॉईड हे नाव कधीही आठवणार नाही, परंतु या दिग्गजांच्या नावावर नाही असे दोन अनोखे विक्रम या अँडी लॉईडच्या नावावर आहेत. 

पहिला म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये कधीही बाद न झालेला तो एकमेव सलामीवीर आहे. आणि दुसरा विक्रम म्हणजे क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटी म्हणजे फक्त अर्ध्या तासाची त्याची कसोटी कारकिर्द आहे. 

कोण हा अँडी लॉईड? हा आहे इंग्लंड आणि वॉर्विकशायरचा डावखुरा फलंदाज! 

वन-डे मालिकेतील यशाने कसोटी संघात-

1984 मध्ये वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्याकाळी क्रिकेट विश्वातील तमाम फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणारे तुफानी गोलंदाज जोएल गार्नर, माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग त्यांच्या संघात होते. अशा तुफानी गोलंदाजांसमोर कसोटी मालिकेआधीच्या तीन वन डे सामन्यात मिळून शंभराच्यावर धावा करणारा अँडी लॉईड एकमेव इंग्लिश फलंदाज होता. साहजिकच कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड झाली आणि आपल्या घरच्या मैदानावर एजबास्टन येथे कसोटी पदार्पण करताना लॉईडला फौलरसोबत सलामीला पाठविण्यात आले. खबरदारी म्हणून लॉईडने हेल्मेट घातलेलेच होते.

मार्शलने चेंडू टाकला आणि....फौलर आणि त्यापाठोपाठ रँडालही झटपट बाद झाला. इंग्लंडची अवस्था 2 बाद 5 अशी झाली. लॉईडच्या जोडीला गॉवर आला. ही जोडी बऱ्यापैकी प्रतिकार करु लागली. लॉईडने चौकारही मारला. आणि डावातील सातवे षटक टाकायला माल्कम मार्शल आला. फलंदाज अँडी लॉईड. त्याने अर्ध्या तासाच्या खेळात 16 चेंडूत 10 धावा केलेल्या.   आणि मार्शलने  जोरात धावत येत एक उसळता चेंडू टाकला, लॉईडने घाबरुनच चेंडूवरील नजर हटवली आणि  खाली झुकत तो चुकवण्याचा प्रयत्न केला पण जे व्हायचे तेच झाले.   चेंडू नेमका लॉईडच्या डोक्यावर जाऊन आदळला. सुदैवाने हेल्मेट होते तरीसुध्दा आघात एवढा जोरात होता की अँडी लॉईड खेळपट्टीवरच कोसळला. त्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या. मैदानावरचे खेळाडू मदतीला धावले. त्याही स्थितीत लॉईड स्वतःच उभा राहिला  आणि स्वतःच चालत पॅव्हिलियनकडे परतला. 

35 टक्के नजर गमावली-

त्याला दवाखान्यात  अॅडमिट करण्यात आले मात्र त्यानंतरही आठवडाभर लॉईडला व्यवस्थित दिसत नव्हते की उमजत नव्हते. या आघातात त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी 35 टक्के अधू झाली. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम-

या घटनेनंतर लॉईड वर्षभर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नाही आणि कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर पुन्हा कधीच खेळला नाही. त्यामुळे क्रिकेट इतिहासात अवघ्या अर्ध्या तासाची कसोटी कारकिर्द लाभलेला क्रिकेटपटू आणि कसोटीत कधीही बाद न झालेला एकमेव सलामीवीर अशी त्याची नोंद झाली. या विक्रमांचे वेगळेपण बघता ते भविष्यात कधी मोडले जाण्याची शक्यता कमीच दिसते. त्यामुळे अनोख्या विक्रमांबाबत अँडी लॉईड सफल नसला तरी एकमेव ठरतो.

 

टॅग्स :अँडी लॉईडक्रिकेट