मुंबई : 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यापासून या संघातील प्रत्येक क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला. या युवा प्रतिभावंतांमधील कोणता खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणार याची बरीच चर्चा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलीय. शुभमन गिल, मनज्योत कालरा, कमलेश नागरकोटी अशी अनेक नावे समोर आहेत. मात्र, एका नावावर सर्वांचे एकमत आहे ते नाव म्हणजे भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा मराठमोळा कर्णधार पृथ्वी शॉ याचे. पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे.
विश्वविजयाची परिक्रमा पूर्ण करून या विश्वविजयी कर्णधाराने आज लोकमतच्या मुंबई ऑफिसला सदिच्छा भेट दिली. यावेळी पृथ्वीवर एकाहून एक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. फेसबुक लाइव्हदरम्यान त्याच्यावर प्रश्नांच्या स्वरूपात बाउन्सर ते यॉर्कर असा भेदक मारा करण्यात आला. त्यानेही कोणतेही आढेवेढे न घेता थेट उत्तरं दिली. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षापासून कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा-या पृथ्वीला 18 व्या वर्षीच तब्बल 10 वर्षांच्या कॅप्टनशीपचा तगडा अनुभव आहे. वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावणा-या पृथ्वीला त्याचा आवडता कर्णधार कोण असा अवघड प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देण्यासाठी पर्याय मात्र त्याच्याकडे दोनच देण्यात आले होते, धोनी की कोहली? पृथ्वीने क्षणभर विचार केला आणि अखेर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्या धोनीलाच त्याने पसंती दिली. मुंबईकर पृथ्वी शॉला जेव्हा वडापाव की बर्गर असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता वडापावची निवड केली. सलमान, शाहरूख आणि आमिर खान यांच्यापैकी कोण आवडता अभिनेता असं विचारल्यावर सलमानचं नाव पृथ्वीने घेतलं. 'सचिन द बिलियन ड्रीम्स' की 'एस. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी' दोन्हीपैकी कोणता सिनेमा आवडला असं विचारल्यावर मात्र, दोन्ही सिनेमे अजून पाहिले नाहीत असं तो म्हणाला.
19 वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉबरोबर लोकमतच्या टीमचं फेसबुक LIVE