भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची ओळख फक्त क्रिकेटपुरतीच मर्यादीत नाही, तर जगभरात सचिनचे करोडो चाहते आहेत. पण सचिन तेंडुलकर नेमका कोण, म्हणत टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोव्हाने वादाला तोंड फोडले होते.
विम्बल्डनचा एक सामना पाहण्यासाठी सचिन आणि माजी महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम गेले होते. या सामन्यानंतर काही पत्रकारांनी शारापोव्हाला एक प्रश्न विचारला होता. आजचा सामना पाहायला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता, तू त्याला ओळखतेस का? या प्रश्नावर शारापोव्हाने नाही असे उत्तर दिले होते आणि मोठा वाद निर्माण झाला होता.
दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला ओळखत नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर शारापोव्हावर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी फैलावर घेतले होते. यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे शारापोव्हा २००५ ते २००८ सालादरम्यान इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी ‘स्पोर्ट्स सेलिब्रेटी’ ठरली होती.
पाचवेळा ग्रँडस्लॅम विजेती दिग्गज टेनिसपटू रशियाच्या मारिया शारापोव्हाने बुधवारी अचानकपणे व्यावसायिक खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर करताना क्रीडाविश्वाला धक्का दिला. क्रीडाविश्वातील दिग्गज आणि नावाजलेल्या खेळाडूंमध्ये शारापोव्हाचा समावेश होत असून गेल्या काही वर्षांपासून ती आपल्या खराब फॉर्मशी झगडत होती.
३२ वर्षीय शारापोव्हाने २००४ साली वयाच्या १७व्या वर्षी टेनिसविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा जिंकून क्रीडाविश्वाचे लक्ष वेधले होते. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना शारापोव्हाने सांगितले की, ‘आतापर्यंत लोक तुला टेनिसमुळे ओळखत होते, पण आता या खेळाविना तू कशी जीवन जगशील? लहान असल्यापासून तू टेनिस कोर्टवर वावरलीस. टेनिसने तुला अनेक आनंदाचे क्षण, तसेच अश्रू दिले. हा असा खेळ होता, ज्यामध्ये तुला तुझा पूर्ण परिवार मिळाला. असंख्य चाहते मिळाले. तू तुझ्यामागे २८ वर्षांची कारकिर्द सोडून जात आहेस.’ एका मासिकातील लेखामध्ये शारापोव्हाने म्हटले की. ‘टेनिस, आता मी तुला गुडबाय म्हणते.’ शारापोव्हाच्या निवृत्तीनंतर सर्वांना तिचे सचिनबाबतचे विधान आठवते आहे.
शारापोव्हाने वयाच्या २०व्या वर्षी २००८ साली ऑस्ट्रेस्लियन ओपन जेतेपद पटकावले होते. यानंतर तिने २०१२ आणि २१०४ साली फ्रेंच ओपन जेतेपदही उंचावले होते. कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे गेलेल्या शारापोव्हाने २००३ ते २०१५ पर्यंत प्रत्येक वर्षी किमान एक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये अशी कामगिरी याआधी केवळ स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोवा व ख्रिस एव्हर्ट यांनीची केली आहे. याशिवाय २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये शारापोव्हाने एकेरीचे रौप्य पदक मिळवले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेची दिग्गज सेरेना विलियम्सविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागला होता.
डोपिंगमुळे लागली उतरती कळा!
कारकिर्द ऐन भरात असताना उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या कारणावरुन शारापोव्हाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. हा तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. याप्रकरणी १५ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शारापोव्हाने २०१७ साली स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान प्रतिबंधित असलेल्या मेल्डोनियम औषधाचे सेवन केल्याप्रकरणी शारापोव्हा दोषी आढळली होती.
Web Title: Who is Sachin Tendulkar, Maria Sharapova's controversial statement ...prl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.