मुंबई : भारतीय क्रिकेट खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आल्याची घटना ताजी असताना राष्ट्रीय क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नावाने अनोळखी व्यक्तीने फेसबुक अकाऊंट उघडले आहे. या अकाऊंटद्वारे बीसीसीआयचे पदाधिकारी आणि पाटिल यांच्या जवळचे माजी क्रिकेटपटूंची माहिती गोळा करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी संदीप पाटील यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे तडाखेबंद फलंदाज म्हणून सर्वांना परिचयाचे आहेत. त्याचबरोबर यशस्वी प्रशिक्षक, निवड समितीचे अध्यक्ष, चित्रपट अभिनेते, लेखक, संपादक अशा विविध भूमिकांत समरस झालेले पहायला मिळाले आहेत. 21 व्या शतकात भारताचे बहुतांश वरिष्ठ खेळांडूप्रमाणे सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त करतात, मात्र संदीप पाटील हे त्याला अपवाद ठरले आहे. आज तागायत त्यांनी कधी ही सोशल मिडियाचा वापर केला नाही, किंवा त्यांचे कोणते ही फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणतेही अकाऊंट नाही. असे असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या नावाने पाटील यांचा फोटोवापरून फेसबुक अकाऊंट उघडून त्यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
संदीप पाटील यांच्या नावाने उघडलेल्या खात्यावरून आरोपीने भारताचे माजी क्रिकेटपटू, बीसीसीआयचे पदाधिकारी यांचे फोननंबर व इतर माहिती मेसेंजरद्वारे मागायचा. मागील दोन आठवड्यापासून हा प्रकार सुरू होता. त्यावेळी अनेक क्रिकेटपट्टूंनी पाटील यांनी नंबर मागितला असल्याचे समजून स्वत:चे मोबाइल नंबर दिल्याचे ही कळते. दरम्यान 19 ऑगस्टला पाटील हे दादर शिवाजी पार्क येथे असताना त्यांच्या मिञांने फोनद्वारे त्याच्या नावे कुणीतरी फेसबुक अकाऊंट सुरू केल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासात दुसऱ्या एका मिञाने त्यांना फोन करून नंबर असताना, "पुन्हा फेसबुकवर नंबर का मागितला? " याबाबत विचारणा केली. त्यावेळी पाटील यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले. अनोळखी व्यक्तीने एवढ्यावरच न थांबता, पाटील यांचे नाव वापरून बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची माहिती ही मागितल्याचे पुढे आले.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी त्यांचे मित्र तसेच 'बीसीसीआय'ला या घटनेची माहिती दिली. तसेच पाटील यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी तक्रार नोंदवली. त्यानुसार शिवाजी पार्क पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा 66(सी) नुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली.