Jay Shah BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. १ डिसेंबरपासून ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या जागी आता बोर्ड नव्या सचिवाच्या शोधात आहे. नव्या नावांबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. या पदासाठी अनेक बाबींचा विचार केला जात असून त्यामुळे मंडळातील राजकारणही चर्चिले जात आहे. जय शाह सचिव पदावर असताना बीसीसीआयने अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यामुळे आता जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्डात जय शाहांचा वारसादार कोण होणार, याची चर्चा रंगली आहे.
'बीसीसीआय'च्या बैठकीत चर्चा
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. त्यात सदस्यांनी जय शहा यांना नवीन सचिवाच्या शोधाला गती देण्याची विनंती केली. हा एजीएमचा मुख्य मुद्दा नसला तरी सदस्यांनी या विषयावर मोकळेपणाने चर्चा केली. जय शाह नोव्हेंबर अखेरपर्यंत या पदावर राहणार आहेत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुखही आहेत. जय शाह दोनही पदे सोडणार आहेत. ACC मध्ये त्यांच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी अध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे. तर BCCI मध्ये जय शाहांच्या जागी ४ नावांची चर्चा आहे.
४ स्पर्धकांची नावे सध्या चर्चेत
इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली, BCCI कोषाध्यक्ष आशिष शेलार, संयुक्त सचिव देवजीत सैकिया आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. वार्षिक सर्वसाधापण सभेचे आणखी एक प्राधान्य म्हणजे ICCच्या बैठकींमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील दोन प्रतिनिधींचे नामांकन देणे. अरुण धुमाळ आणि अभिषेक दालमिया यांची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये जनरल बॉडी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. धुमाळ IPL 2025 पर्यंत लीगचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील.