Join us  

रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या 3 खेळाडूंमध्ये 'काटे की टक्कर'!

गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 3:02 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI लवकरच भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करू शकते. गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करणे जवळपास निश्चित झाले आहे. गौतम गंभीर बीसीसीआयसोबत जो करार करणार आहे तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंतचा असेल. महत्वाचे म्हणजे, गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल.

रोहित शर्मा सध्या ३७ वर्षांचा आहे. यामुळे अधिक काळ टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणे त्याला शक्य होणार नाही. सध्या भारतीय संघात एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची जागा घेऊ शकतील, अशा क्षमतेचे तीन खेळाडू आहेत. तर जाणून घेऊयात या तीन खेळाडूंसंदर्भात...

ऋषभ पंत -ऋषभ पंत हा एक उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्या अंगी कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना जबरदस्त कामगिरी केली आहे. महत्वाचे म्हणजे, ऋषभ पंतकडेही एमएस धोनी प्रमाणेच क्षमता आहे. मैदानावर यष्टीरक्षकाला खेळाडूच्या तुलनेत खेळ अधिक समजतो, असे बोलले जाते. यामुळेच, ऋषभ पंतला संधी मिळालीच तर तो देखील एमएस धोनीप्रमाणे यशस्वी कर्णधार ठरू शकतो.

हार्दिक पांड्या -अष्टपैलू हार्दिक पांड्यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता आहे. त्याच्या नेतृत्व करण्याच्या शैलीत कपिल देवची झलक बघायला मिळते. हार्दिकने गुजरात टायटन्सला आयपीएल 2022 चे विजेतेपद मिळवून दिले होते. हार्दिक पंड्या फलंदाजी करतानाही संयमाने खेळतो. तसेच तो 140 किमी प्रतितास एवढ्या वेगाने गोलंदाजीही करू शकतो. हार्दिक पांड्यामध्ये कर्णधार बनण्याचे सर्व गुण आहेत. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.

श्रेयस अय्यरश्रेयस अय्यर देखील भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीतील मोठा दावेदार आहे. कर्णधारपद मिळाल्यास श्रेयस अय्यरही टीम इंडियाचे नशीब बदलू शकतो. टीम इंडियाला श्रेयस अय्यरसारख्या बिनधास्त फलंदाजाची आणि स्मार्ट कर्णधाराची आवश्यकता आहे. श्रेयसच्या फलंदाजीप्रमाणेच त्याच्या नेतृत्वातही आक्रमकता दिसू शकते. याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. श्रेयस अय्यर हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR)  IPL 2024 ची ट्रॉफी जिंकून दिली आहे. विशेष म्हणजे, त्याला गौतम गंभीरसोबत काम करण्याचा अनुभवही आहे.

टॅग्स :रोहित शर्माहार्दिक पांड्यागौतम गंभीररिषभ पंतश्रेयस अय्यर