WTC Final 2023, India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ७ जूनपासून सुरू होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ लंडन ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळणार आहेत. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्या वेळी विजेतेपदाची लढत न्यूझीलंडशी झाली होती ज्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत टीम इंडिया दुसऱ्यांदा मिळालेल्या संधीचे सोने करायचे प्रयत्न करेल. मात्र, या दरम्यान, कसोटी सामना अनिर्णित राहून बरोबरीत सुटला तर चॅम्पियन कोण होणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत असतील. जाणून घ्या त्याबद्दलचा नियम.
सामना ड्रॉ झाला तर...?
कसोटी सामन्यातील विजय-पराजयाच्या निकालासोबतच अनिर्णित सामन्यांची संख्याही खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कोणत्याही कारणास्तव अनिर्णित राहिला, तर आयसीसीच्या नियमांनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियातील कोणत्याही संघाला ट्रॉफी वाटून घेणं आवडणार नाही. अशा परिस्थितीत दोघांचा प्रयत्न असेल की ते कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून चॅम्पियन व्हायचे.
या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग 2023 संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. येथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावही सुरू केला. रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या प्रकारचा संघ निवडायचा याचे मोठे आव्हानच आहे. गेल्या वेळी टीम इंडिया दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली होती, मात्र ही योजना सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जी चूक झाली तीच पुनरावृत्ती करून चॅम्पियन बनण्याची संधी रोहित शर्माला चुकवायला आवडणार नाही. अशा स्थितीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियासमोर मजबूत रणनीतीचे आव्हान उभे करावे लागणार आहे.