विशाखापट्टणम : आयपीएलच्या १२ व्या सत्रात अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सपुढे शुक्रवारी येथे रंगणा-या दुस-या क्वालिफायरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. या सामन्यातील विजेता संघ रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध जेतेपदासाठी भिडेल.
चेन्नईने चेपॉकवर दिल्ली कॅपिटल्सला ८० धावांनी नमवून पहिल्या दोन स्थानांवर येण्यापासून रोखले होते. आता क्वालिफायर-२ मध्ये पुन्हा एकदा दिल्लीपुढे चेन्नईचाच अडथळा असेल. बुधवारी एलिमिनेटरमध्ये अखेरच्या षटकात तणावपूर्ण स्थितीत दिल्लीला विजय मिळवून देण्यात रिषभ पंतची निर्णायक भूमिका राहिली. दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ५६ धावा ठोकून विजयी पाया रचला होता. दिल्ली संघ या मैदानावर एलिमिनेटर सामना खेळला असल्याने चेन्नईच्या तुलनेत खेळपट्टी आणि परिस्थितीचा लाभ त्यांना मिळू शकतो. कासिगो रबाडा याच्या अनुपस्थितीत वेगवान इशांत शर्मा तसेच ट्रेंट बोल्ट यांनी दमदार कामगिरी केली. कीमो पॉल यांनी दोघांना साथ देत तीन गडी बाद केले होते. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा यालादेखील एक गडी बाद करण्यात यश आले. दिल्लीचे फलंदाज येथील खेळपट्टीवर चेन्नईचे फिरकी गोलंदाज हरभजनसिंग आणि इम्रान ताहिर यांचा मारा कसा खेळतात, यावर त्यांची वाटचाल अवलंबून असेल.
दुसरीकडे, चेन्नईला मोठ्या लढतींची सवय आहे. हा संघ तीनदा विजेता, तर चारवेळा उपविजेता राहिला आहे. असे असले तरी, पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला. यानंतर निराश झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजांकडून खेळपट्टी समजून धावा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली. मुंबईविरुद्ध घरच्या मैदानावर खेळपट्टी समजून घेण्यात आम्ही अपयशी ठरल्याची कबुली धोनीने दिलीच आहे. याशिवाय खराब फटक्यांची निवड केल्याने त्याने सहकारी फलंदाजांची कानउघाडणीही केली होती.
सामना : सायं. ७.३० वाजता
Web Title: Who will challenge Mumbai Indians? Chennai, Delhi will fight against each other today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.