कोलकाता : ऑस्ट्रेलियाच्या अफगाणिस्तानवरील चमत्कारिक विजयानंतर वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात या संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळावे लागेल, हे निश्चित झाले. त्याच वेळी सलग आठ सामने जिंकणाऱ्या अव्वल स्थानावरील भारतीय संघाची गाठ उपांत्य लढतीत चौथ्या स्थानावरील संघाविरुद्ध पडेल. झुंजार अफगाणिस्तानने पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला मंगळवारी वानखेडेवर दिलेली टक्कर वाखाणण्याजोगीच आहे. मात्र, क्षेत्ररक्षणातील गंभीर चुकांमुळे त्यांना ऐतिहासिक विजयापासून मुकावे लागले. अफगाणिस्तानच्या पराभवाचा फायदा ऑस्ट्रेलियासोबतच पाकिस्तानलाही झाला आहे. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ चढाओढ करीत आहेत. या तिन्ही संघांचे सारखे ८ गुण आहेत. धावगतीमुळे गुणतालिकेत त्यांचा क्रम मात्र वरखाली आहे. न्यूझीलंडची धावगती अधिक ०.३९८ अशी असून, हा संघ बंगळुरू येथे अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मोठ्या गुणफरकाने जिंकावा लागेल शिवाय पाकिस्तान (अधिक ०.०३६) आणि अफगाणिस्तान (उणे ०.०३८) यांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. न्यूझीलंडने सलग चार सामने गमावले. बंगळुरूतील सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. ईडनवर भारत-पाकिस्तान यांच्यात उपांत्य सामना होईल, असे क्रिकेटतज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी पाकिस्तानला शनिवारी इंग्लंडवर धडाकेबाज विजय नोंदवावा लागेल. बाबर आझमचा संघ लयीत येत आहे. या संघाला एक मोठा विजय प्रबळ दावेदार बनवू शकतो. पाकला न्यूझीलंड आणि अफगाणिस्ताननंतर सामना खेळायचा आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरावी. त्यामुळे समीकरण माहीत होईल.
अफगाणिस्तानचा सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. याचा अर्थ पाकिस्तान संघ शनिवारी इंग्लंडविरुद्ध साखळी सामना खेळेल तेव्हा त्यांना धावगतीबाबत माहिती असेलच. अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठायची झाल्यास दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. धावगतीत हा संघ सर्वांत मागे आहे. न्यूझीलंड आणिपाकिस्तान पराभूत झाले तर अफगाणिस्तानचे काम केवळ विजयावरच भागू शकेल. नेदरलँड्सचे ४ गुण असून त्यांना अखेरच्या सामन्यात भारताविरुद्ध खेळायचे आहे. त्यांना धक्कादायक विजयांची गरज आहे, कारण त्यांची धावगती उणे १.५०४ इतकी आहे. त्यामुळे नेदरलँड्सची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता तशी कमीच आहे.