न्यूझीलंड विरुद्ध १८ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी डोकेदुखी आहे. अंतिम ११ खेळाडूंमध्ये दोन फिरकीपटूंना संधी द्यायची का, जर तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली तर ते कोण असतील, रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार कोण असावा, अशा प्रश्नांचे शास्त्री आणि कोहली यांच्या डोक्यात काहूर माजले असावे.
फिरकीपटूंची निवड हा मोठा अडचणीचा प्रश्न आहे. आर. अश्विन व रवींद्र जडेजा आणि त्या तुलनेत दोन नवोदित वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल हे आहेत. अनुभव व सध्याच्या फॉर्मचा विचार करता आर. अश्विन अन्य फिरकीपटूंच्या तुलनेत आघाडीवर आहे. जर दोन फिरकीपटूंची निवड झाली तर अश्विन अंतिम संघात असेल. त्यानंतर दोन डावखुऱ्या फिरकीपटूंमध्ये कुणाची निवड करायची हा पेच सोडवावा लागेल. मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजा दुखापतग्रस्त असताना अक्षरने २७ बळी घेतले होते. माझ्या मते दौऱ्यावरील निवड समिती जडेजाला झुकते माप देईल. पण, इंग्लंडमधील त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता केवळ एक फिरकीपटू खेळवायचा असेल तर अश्विन किंवा जडेजा यांच्यापैकी कुणाची निवड करायची असा प्रश्न उपस्थित होईल. दोघेही संघात स्थान मिळविण्याचे दावेदार आहेत. क्षेत्ररक्षणाचा विचार करता अश्विन जडेजाच्या तुलनेत पिछाडीवर आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांची गेल्या दोन-तीन वर्षांतील फिरकी गोलंदाजांविरुद्धची कामगिरी लक्षात घेता अश्विन व जडेजा या दोघांनाही संधी मिळायला हवी. सलामीवीराच्या दुसऱ्या स्थानासाठी शुभमन गिलला माझी पसंती राहील.
n वेगवान गोलंदाजांची निवड हा सुद्धा ऐरणीचा मुद्दा आहे. संघात सहा वेगवान गोलंदाज आहेत. त्यात बुमराह, ईशांत, शमी, सिराज, शार्दूल, यादव आदींचा समावेश आहे. मी उल्लेख केलेल्या पहिल्या चारपैकी एकाला बाहेर बसावे लागेल. तो कोण असेल ? बुमराह जगातील अव्वल तीन गोलंदाजांपैकी एक आहे. ईशांतला १५ वर्षांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्याचा कौंटी स्पर्धेत खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. शमी भारताचा सर्वांत स्किलफूल वेगवान गोलंदाज आहे. जर त्याला लवकर सूर गवसला तर तो सर्वांत भेदक ठरतो. इंग्लंडच्या गेल्या दौऱ्यात तो सर्वांत प्रभावी ठरला होता. युवा सिराजने पदार्पणापासून छाप सोडली आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल असल्यामुळे निवडकर्ते अनुभवाला प्राधान्य देतील, विशेषता गोलंदाजीमध्ये. त्यामुळे गेल्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या सिराजला सिनियर खेळाडूंना संघातील स्थान मोकळे करून द्यावे लागेल.