नवी दिल्लीभारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिल्या कसोटी सलामीवीर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळावी लागणार आहे. मयांक अग्रवाल याच्यासोबत भारतीय डावाची सुरुवात कोण करणार? यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या सलामीसाठी शुभमन गिल या युवा खेळाडूचं नाव सुचवलं आहे.
"ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी भारतीय संघाची सुरुवात मयांक अग्रवालसोबत शुभमन गिलने करायला हवी. कारण त्यानं चांगली कामगिरी केली आहे. सराव सामन्यात त्यानं सर्वांना प्रभावित केलं आहे", असं गावसकर म्हणाले.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनीही गिलच्या नावाला दुजोरा दिला आहे. "पृथ्वी शॉच्या तुलनेत शुभमन गिलच्या फलंदाजे तंत्र हे ऑस्ट्रेलियातील परिस्थितीला अनुकूल आहे", असं बॉर्डर म्हणाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ पूर्णपणे अपयशी ठरताना दिसला. शॉने त्याच्या चार इनिंगमध्ये अनुक्रमे ०, १९, ४० आणि ३ अशा धावा केल्या आहेत.
"गेल्या काही दिवसांपासून मी सिडनीमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारतीय संघाच्या सामन्यावेळी उपस्थित होतो. शुभमन गिलच्या फलंदाजीने मी नक्कीच प्रभावित झालो. तंत्रशुद्ध फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. युवा खेळाडू असल्यानं संयमाचा अभाव असल्याचं मी समजू शकतो पण तो एक अतिशय गंभीर क्रिकेटपटू वाटतो", असं बॉर्डर म्हणाले.