मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली आहे... यंदाचा वर्ल्ड कप कोण उंचावणार याच्या पैजा लागत आहेत. जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे, पण बेटिंगच्या दुनियेत भारतीय संघ नव्हे तर दुसऱ्याच संघाला पसंती मिळत आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्स येथे क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात कोण जिंकणार, कोणता फलंदाज/गोलंदाज भारी ठरणार यावर जोरात बेटिंग सुरू आहे.
Economic Timesनं दिलेल्या वृत्तानुसार यजमान इंग्लंडला पंटर्सची पहिली पसंती आहे. इंग्लंडवर 15/8 असा सट्टा सुरू आहे, तर भारतावर 3/1 आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर 9/2 असा भाव सुरू आहे. इंग्लंडच्या बाबतीत सट्टा समजावून सांगायचा झाल्यास लावलेली रक्कम 15 ने गुणायची आणि नंतर 8 ने भागायची. उदाहरण द्यायचे झाल्यास जर तुम्ही इंग्लंडवर 50,000 लावलेत तर तुम्हाला (50,000 x 15)/8 +50,000 = 1,43,750 इतकी रक्कम मिळेल. या क्रमवारीत अफगाणिस्तान 100/1 तळावर आहे.
आणखी एका ऑनलाईन बेटिंग साईटनेही इंग्लंडला ( 3.25) पसंती दर्शवली आहे. त्यानंतर भारत ( 3.75) आणि ऑस्ट्रेलिया ( 4.5) यांचा क्रमांक येतो. श्रीलंका ( 51), अफगाणिस्तान आणि बांगलादेश ( प्रत्येकी 81) तळावर आहे. कर्णधार इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जोस बटलर आणि जो रूट यांच्यामुळे इंग्लंडची बाजू भक्कम झालेली आहे. भारताच्या बाबतीत बोलाचये झाल्यास कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनी हे हुकुमी एक्के आहेत.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट कोण घेणार, यासाठी अनुक्रमे कोहली व जसप्रीत बुमराह हे आघाडीवर आहेत. कोहलीवर 6/1 असा भाव सुरू आहे. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर ( 10/1), जो रूट ( 12/1), जॉनी बेअरस्टो ( 14/1) आणि क्विंटन डी कॉक (14/1) यांचा क्रमांक येतो. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्मावर 14/1 असा तर शिखर धवनवर 16/1 असा भाव सुरू आहे. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये वॉर्नरने सर्वाधिक 692 धावा केल्या होत्या, तर कोहलीला 14 सामन्यांत 464 धावा करता आल्या होत्या.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहला सर्वाधिक पसंती आहे. बुमराहवर 14/1 असा भाव आहे. त्यापाठोपाठ युजवेंद्र चहल ( 16/1) आणि मोहम्मद शमी ( 18/1) या भारतीय गोलंदाजांनी अव्वल 10 मध्ये स्थान पटकावले आहे.