Join us  

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 5:33 PM

Open in App

IPL 2023 Final : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली. उद्या याच दोन सघांमध्ये जेतेपदाचा सामना रंगणार आहे आणि तोही अहमदाबाद येथेच... महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK ने आयपीएल फायनलमध्ये जाण्याचा पहिला मान पटकावला आणि क्वालिफायर २ मध्ये GT ने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पण, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मग अशा परिस्थितीत सामना न झाल्यास विजेता कोण ठरेल?

गुजरात टायटन्स हे घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. क्वालिफायर २ मध्येही पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल विरोधात जाऊनही GT ने बाजी मारली. शुबमन गिलच्या १२९ धावांच्या जोरावर गुजरातने २३३ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मोहित शर्माने १० धावांत ५ विकेट्स घेत मुंबईचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत पाठवला. गुजरातने ८२ धावांनी सामना जिंकला. पण, हार्दिक पांड्याचा मुकाबला चतुर कर्णधार धोनीशी आहे. त्यामुळे उद्याचा सामना रोमहर्षक होईल हे नक्की आहे.

फायनल सामन्यावरही पावसाचा अंदाज आहे. AccuWeather नुसार सामन्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ४९ टक्के आहे आणि जस जसा सामना पुढे सरकेल तशी ही शक्यता ६८ टक्क्यांपर्यंत जाईल. म्हणजे सामना २० पेक्षा कमी षटकांचा होण्याचा अंदाज आहे. जर पावसाचा जोर वाढला तर मॅच रद्दही केली जाऊ शकते.

सामना न झाल्यास कोण विजयी ठरेल?IPL Final साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीतील गुणांच्या आधारे विजयी संघ ठरवला जाईल. असे झाल्यास २० गुणांसह टॉपर राहिलेल्या गुजरात टायटन्सकडे जेतेपदाची ट्रॉफी कायम राहिल.   

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सनरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App