Join us  

भारताला जो हरवेल, तो वनडे विश्वचषक जिंकेल : वॉन

जो संघ भारताला नमविण्याची हिंमत दाखवेल, तोच हा विश्वचषकही जिंकेल.’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 5:44 AM

Open in App

लंडन : ‘यजमान भारतीय संघाला जो हरवू शकेल त्या संघाकडे २०२३ चा वनडे विश्वचषक जिंकण्याची शानदार संधी असेल,’ असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने सोमवारी व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताने ५ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर वॉनने हे वक्तव्य केले. होळकर मैदानावर भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर वॉन प्रभावित झाला. ट्विटरवर वॉन म्हणाला, ‘भारताकडे भक्कम फलंदाजी आणि गोलंदाजी फळी आहे. त्यांना इतर संघांकडून रोखण्याचा प्रयत्न निष्फळ ठरू शकतो. केवळ अपेक्षांचे ओझेच त्यांच्या जेतेपदाच्या मार्गात अडथळा ठरू शकेल. माझ्यासाठी हे स्पष्ट आहे की, जो संघ भारताला नमविण्याची हिंमत दाखवेल, तोच हा विश्वचषकही जिंकेल.’

‘भारतीय संघ खऱ्या अर्थाने आता संपूर्ण संघ बनला. सुरुवातीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि त्यानंतर फिरकीपटूंची मिळणारी साथ, क्षेत्ररक्षणातील चाणाक्षपणा तसेच राखीव बाकावर बसणारे खेळाडू याचा विचार केल्यास विश्वचषकात यजमान संघाचे पारडे जड वाटते. अन्य संघांच्या तुलनेत त्यांच्यावर चाहत्यांच्या अपेक्षांचे अधिक ओझे असेल. हे दडपण झुगारून लावल्यास भारताला जेतेपदापासून रोखणे कठीण आहे. जो संघ भारताचा विजयरथ थोपविण्यात यशस्वी ठरेल, तो जगज्जेता होईल,’ असे आपले मत असल्याचे वॉन म्हणाला. विश्वचषकात भारताला सलामीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळायचे आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघइंग्लंड