नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या तीन आठवडे विश्रांती घेण्याच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आक्षेप घेतला आहे.
साऊथम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताला आठ गडी राखून धूळ चारली. आता थेट ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. यादरम्यानच्या काळात भारतीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणाच्या बाहेर पडण्याची मुभा आहे. ‘जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर पुरेसा सराव न केल्याचा भारताला फटका बसला. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवड्यांसाठी सुटीवर कसे जाऊ शकतात, हे मला कळत नाही. एक आठवड्याची विश्रांती खेळाडूंसाठी पुरेशी ठरली असती,’ असे वेंगसरकर म्हणाले.
माजी मुख्य निवडकर्ते वेंगसरकर पुढे म्हणाले, ‘ दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा मी आनंद लुटला. भारतीय संघ याआधी सर्वच सामन्यात वरचढ ठरला. अंतिम सामन्यात मात्र त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळून न्यूझीलंड अंतिम लढतीसाठी फिट होता. भारतीय संघ आता किमान २० दिवस क्रिकेटपासून दूर राहणार असून १४ जुलै रोजी खेळाडू एकत्र येतील. व्यवस्थापनाचा हा निर्णय मला काही रुचलेला नाही.’
‘मध्येच तुम्ही सुटीवर जाता आणि नंतर पुन्हा क्रिकेटसाठी एकत्र येता, हा कुठल्या प्रकराचा कार्यक्रम आहे? फायनलनंतर एक आठवड्याची विश्रांती पुरेशी आहे. येथे सतत खेळत राहणे गरजेचे असते. अशा दौऱ्याला मंजुरी कशी काय मिळाली, याचे मला आश्चर्य वाटते’ या शब्दात वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
विराटने तयारी का केली नाही !
भारतीय कर्णधार विराट कोहली याने पराभवानंतर फलंदाजांकडे बोट दाखवित धावा काढण्याप्रती समर्पित असयला हवे,असे वक्तव्य केले होते. वेंगसरकर यांनी यावरही टीका केली. तयारीबाबत तूदेखील समर्पित वृत्ती दाखवायला हवी, असे त्यांनी विराटला सुनावले.