मतीन खान
स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह
टी-२० विश्वचषकाच्या आधी रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या पत्रकार परिषदेतील गोष्टी ऐकून चाहते चांगलेच सुखावले. मैदानावर कडवे प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांचा फार आदर करतात. जेव्हा कधी भेटतात, तेव्हा कुटुंबीय कसे आहेत याची विचारणा होते. एकमेकांकडे कुठल्या गाड्या आहेत, कुठल्या नवीन घेतल्याबद्दल विचारपूस केली जाते.
पिढ्यानपिढ्या हे असेच सुरू आहे. या गोष्टी कानावर पडल्याने क्रिकेटपटूंप्रति चाहत्यांच्या मनात आणखी आदर वाढला असणार; पण त्याचवेळी जे खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांचे मित्र असतात, तेच मैदानात परस्परांचे रक्तपिपासू कसे काय होऊ शकतात, याचे सर्वाधिक आश्चर्य वाटते.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात मिचेल स्टार्कचा चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळताच सर्वजण स्तब्ध झाले. इतकेच नव्हे तर लोकेश राहुलच्या हेल्मेटवरदेखील पॅट कमिन्सचा आखूड टप्प्याचा चेंडू आदळला. राहुल काही क्षण अक्षरश: हादरला होता. हेल्मेटविना खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या चेहऱ्यावर युझवेंद्र चहलचा चेंडू लागला तेव्हा क्षणार्धात त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. ‘जेंटलमन’ समजल्या जाणाऱ्या खेळात हाणामारी का?
जवळपास सर्वच खेळांत कधी मैदानावर ‘राडा’ किंवा हाणामारी पहायला मिळते. क्रिकेटमध्ये हा प्रकार थेट जीवावर उठतो. यामागील कारण खेळाडूंवर उत्कृष्ट कामगिरीचे असलेले दडपण! याच कारणांमुळे खेळाडू कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही, या ईर्ष्येने भिडतात. त्यांची कृती कुणासाठी जीवघेणी बनणार असली तरी त्यांना फरक पडत नाही.
खेळाचे मैदान असो वा आयुष्यातील लढा, शायर बशीर बद्र म्हणतात,
‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों!’
फलंदाज बाद करण्यापेक्षा खेळपट्टीवर रक्त वाहताना पाहण्यात आनंद
गोलंदाज, त्यातही वेगवान गोलंदाज फारच तरबेज असतात. जवळपास १६० ग्रॅमच्या चेंडूचा एखाद्या क्षेपणास्त्रासारखा फलंदाजावर मारा करतात. हा चेंडू किती घातक असेल याची त्यांना पर्वा नसते. ऑस्ट्रेलियाचे १९७०-८० च्या दशकातील वेगवान गोलंदाज ज्योफ थॉम्पसन नेहमी म्हणायचे की, ‘मला फलंदाजाला बाद करण्यापेक्षा खेळपट्टीवर त्याचे रक्त वाहताना पाहण्यात आनंद येतो.’ नरी कॉन्ट्रॅक्टर यांना झालेली जखम कशी विसरणार? चार्ल्स ग्रिफिथचा चेंडू त्यांच्या डोक्यावर आदळल्याचा आवाज चक्क ड्रेसिंग रूमपर्यंत आला होता. ते सहा दिवस कोमात गेले होते. जीव वाचविण्यासाठी त्यांच्या डोक्यात लोखंडी प्लेट लावण्यात आली शिवाय त्यांची कारकीर्ददेखील संपुष्टात आली.
ह्युजच्या मृत्यूने क्रिकेटविश्व हादरले
आपल्या २६ व्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी २७ नोव्हेंबर २०१४ ला ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजचा डोक्याला चेंडू लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सिडनीच्या मैदानावर झालेल्या शेफिल्ड शिल्डच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शॉन एबॉटचा बाउंसर ह्युजच्या डोक्यावर आदळला आणि तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले. विशेष म्हणजे ह्युज आणि एबॉट हे चांगले मित्र होते. मात्र, आपण टाकलेल्या बाउंसरचा असा परिणाम होईल याचा एबॉटने स्वप्नातदेखील विचार केला नसावा.
Web Title: Why are cricketers bloodthirsty on the field spacial article on cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.