इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) कंबर कसली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय येईपर्यंत बीसीसीआयने वेट ॲंड वॉचची भूमिका घेतली आहे. पण, सूत्रांच्या माहितीनुसार २६ सप्टेंबरपासून आयपीएल खेळवण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. पण, त्यांच्यामार्गात एक अडथळा आला आहे. बीसीसीआयच्या या तारखांवर ब्रॉडकास्टरने नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. पण कोरोन व्हायरसमुळे तीनवेळा लीग पुढे ढकलण्यात आली. आता बीसीसीआय २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याच्या तयारीत आहे. आयपीएल आयोजनाच्या शर्यतीत सध्या संयुक्त अरब अमिराती ( यूएई) आघाडीवर आहे. ४४ दिवसांत ६० सामने खेळवण्यात येणार आहेत.
पण, आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या तारखांवर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आयपीएल दिवाळीपर्यंत खेळवण्यात यावी अशी ब्रॉडकास्टरची इच्छा आहे. तसे झाल्यास त्यांना भरपूर जाहिराती मिळतील. पण, बीसीसीआय त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी, हा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ३ डिसेंबरपासून होणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईन कालावधी कमी व्हावा अशी इच्छा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व्यक्त केली होती. "८ नोव्हेंबरला आयपीएल संपल्यानंतर १० तारखेला भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होतील. त्यानंतर कोरोना चाचणी आणि सरावाला सुरुवात करू शकतील. त्यानंतर पहिली कसोटी ठरलेल्या तारखेनुसार सुरू होईल," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.