नवी दिल्लीः अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाचा देशभरात जयजयकार सुरू असून कर्णधार पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पृथ्वी शॉच्या फलंदाजीबद्दल, त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल आणि उज्ज्वल भवितव्याबद्दल चर्चा होत असतानाच, त्याच्या जर्सीवरचा 100 नंबरही कुतूहलाचा विषय ठरलाय. या 100 नंबरी टी-शर्टमागचं मजेशीर गुपित आता उघड झालंय.
साधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने हा नंबर का निवडला असेल, सचिन तेंडुलकरच्या जर्सीवरील 10 या आकड्याशी त्याचं काही 'कनेक्शन' असेल का, की आणखी काही श्रद्धा-अंधश्रद्धेचा भाग असेल, याबद्दल उत्सुकता होती. त्याचं उत्तर अखेर पृथ्वी शॉकडूनच मिळालंय. त्याने 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राशी बोलताना त्यामागचा किस्सा सांगितला.
शंभर हा माझा आवडता क्रमांक आहे आणि माझ्या आडनावाचा हिंदी उच्चार साधारणपणे 'सौ' असा होतो. त्यामुळे मी 100 नंबरची जर्सी निवडली, असं पृथ्वीनं गालातल्या गालात हसत सांगितलं. हा नंबर निवडण्यामागे गुडलक किंवा अंधश्रद्धा वगैरे नव्हती, असं तो म्हणाला.
पृथ्वी शॉमध्ये अनेकांना भावी सचिन तेंडुलकर दिसतो. मुंबईच्या या वीराने मुंबई संघातून रणजीत पदार्पण केलं होतं. पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चार शतकं ठोकून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता सचिनच्या जगप्रसिद्ध 10 नंबरच्या जर्सीत एक आकडा वाढवून त्याचा वारसा पुढे नेण्याचा मानसच जणू पृथ्वी शॉनं व्यक्त केल्याचं क्रिकेटवर्तुळात बोललं जातंय.