कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील क्रिकेटपटूंची अनेकदा तुलना केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझम या दोघांच्या खेळाची आणि फलंदाजीची अनेकदा तुलना होते. काही दिवसांपूर्वी माजी आॅस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी याने ‘ तुम्हाला विराट कोहली उत्तम फलंदाज वाटत असेल, तर बाबर आझमची फलंदाजी नक्की बघा’, असे मत नोंदवले होते. दुसरीकडे ‘विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे. बाबर आझम त्याच्या आसपासही नाही,’ असे मत पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने व्यक्त केले. आता खुद्द पाकचा नवा कर्णधार बाबर आझमने वक्तव्य केले.
‘तुम्हाला माझी कोणाशी तुलना करायचीच असेल, तर विराटपेक्षा पाकिस्तानच्या महान खेळाडूंशी तुलना करा. जावेद मियांदाद, युनिस खान, इंझमाम उल हक असे महान खेळाडू होऊन गेले. त्या महान खेळाडूंशी जर माझी तुलना करण्यात आली, तर मला अधिक आनंद होईल. यशाचा मला गौरव झाल्यासारखे वाटेल,’ असे आझमने टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना म्हटले आहे. कोहलीपेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या बाबरला कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी दीर्घ पल्ला गाठायचा आहे. कोहलीच्या खात्यात सध्या ७० आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद झाली. बाबरची १६ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत मी कुठल्याही एका गोलंदाजाला टार्गेट करणार नसल्याचे बाबरने स्पष्ट केले. कसोटीत तिहेरी शतक ठोकण्याची इच्छा असल्याचे मत बाबरने व्यक्त केले. माजी कर्णधार सर्फराज अहमद संघात असला तरी यष्टिरक्षणासाठी प्रथम पसंती मोहम्मद रिझवान यालाच असेल, असे संकेतही बाबरने दिले.
‘गोलंदाज कोण आहे हे पाहत नाही. प्रत्येक चेंडू गुणवत्तेच्या आधारे खेळतो. इंग्लंडकडे शिस्तबद्ध गोलंदाज असून घरच्या स्थितीचा ते लाभ घेतील. अशा आव्हानात्मक स्थितीतच मला धावा काढायच्या आहेत.’ - बाबर आझम
Web Title: Why compare me to Virat, the question of Pakistan's new captain Babar Azam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.