बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली, परंतु त्यांच्या या घोषणेपेक्षा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची मेंटॉर म्हणून झालेली निवड ही मोठी बातमी ठरली. यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनी टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. पण, अचानक असं काय घडलं, की धोनीला मार्गदर्शक म्हणून नेमावं लागलं?; याचा उलगडा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं ( Sourav Ganguly) केला आहे. विराट कोहली अँड टीमला कोणत्याही परिस्थितीत आयपीएल ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यासाठीच हा निर्णय घेतला गेला.
यूएईत होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेत धोनीचं संघासोबत असणे किती महत्त्वाचे आहे, हे गांगुलीनं समजावून सांगितले. तो म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठी मदत मिळेल. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये भारताकडून व चेन्नई सुपर किंग्सकडून त्याचा रिकॉर्ड दमदार आहे. त्याच्या निवडीमागे अनेक विचार होते. आम्ही खूप चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. २०१३नंतर आम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह वॉ याच्यावर अशीच जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी इंग्लंडमध्ये झालेली अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. त्यामुळे मोठ्या खेळाडूचं सोबत असणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, '' असे गांगुली म्हणाला.