मुंबई विरुद्ध रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. हे पाहून मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण एखाद्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडू हातावर काळी पट्टी बांधतात. सामना संपल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या वडिलांचे निधन झाले, असे समजले.
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी कॉन्वेच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी दिली. त्यानंतर मैदानात शोकाकूळ वातावरण निर्माण झाले. मुंबईविरुद्ध सामन्यात कॉन्वे चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता. कॉन्वे आता त्याच्या घरी परतण्याची शक्यता आहे. चेन्नईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉन्वेच्या वडिलांच्या निधनाची बातमी देऊन शोक व्यक्त केला. 'कॉन्वेच्या वडिलांना जगाचा निरोप घेतला असून या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत', असे चेन्नईने ट्विट केले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये कॉन्वेने आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण ९४ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात कॉन्वेने ६९ धावांची खेळी केली. मात्र, हा सामना चेन्नईने १८ धावांनी गमावला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास कठीण मानले जात आहे. चेन्नईला आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे. याशिवाय, संघाचा रनरेट देखील अत्यंत खराब आहे. चेन्नईला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. चेन्नईच्या संघाने पुढील सर्व जिंकले तर, त्यांचे १६ गुण होतील.