मुंबई - स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने ‘आयपीएल २०२४’मध्ये गुजरात टायटन्सला बाय बाय करण्याचा निर्णय का घेतला? यामागे केवळ ‘अर्थकारण’ आहे की, आणखी काही कारणे असावीत, याचा शोध घेताना क्रिकेट चाहते डोके खाजवीत आहेत. हार्दिक आपल्या मूळ ‘मुंबई इंडियन्स’मध्ये परतल्यानंतर यामागे वरिष्ठ पातळीवर मोठी ‘डील’ झाल्याचे कारण सांगितले जात आहे. हार्दिकने मुंबईकडून ९२ सामने खेळले आहेत. त्याच्या १४७६ धावा असून, त्याने ४२ गडी बाद केले आहेत.
क्रिकेट जाणकारांच्या मते, गुजरात आणि मुंबई फ्रँचायझी मालकांनी परस्पर निर्णय घेत आपले म्हणणे ‘बीसीसीआय’ला पटवून दिले असावे. आयपीएल नियमानुसार हार्दिकला स्वत:कडे घेणारा मुंबई संघ गुजरातला १५ कोटी देईल. शिवाय स्थानांतरण फीच्या रूपानेदेखील काही रक्कम गुजरातला मिळणार आहे.
या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयपीएल २०२३’मध्ये गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याआधी २०२२ ला पहिल्याच सत्रात गुजरात संघ हार्दिकच्या नेतृत्वात चॅम्पियन बनला होता. दोन वर्षे फायनलमध्ये पोहोचविल्यामुळे हार्दिक यशोशिखरावर पोहोचताच त्याच्यात आणि संघ व्यवस्थापनात काही मुद्द्यांवर मतभेद वाढतच गेले.
हार्दिकला मैदानावर पूर्ण मोकळीक होती. त्याचे विचार संघ व्यवस्थापनाच्या विचारांशी जुळत नसावेत. मनमानी करणारा कर्णधार भविष्यात आपल्याकडे नको, या निर्णयाअंतर्गत व्यवस्थापनाने हार्दिकला ट्रेड करण्याचा निर्णय घेतला असावा.
गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि हार्दिक यांच्या संबंधात काहीतरी बिनसले होते. त्यामुळे २०२३ चे आयपीएल संपल्यापासूनच हार्दिकने ‘मुंबई इंडियन्स’मध्ये परतण्याची तयारी सुरू ठेवली होती. व्यवस्थापनाला याची कुणकुण लागताच त्यांनीही ताठर भूमिका स्वीकारली. पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर वनडे विश्वचषकासाठी तो भारतीय संघात परतला खरा; पण बांगलादेशविरुद्ध घोट्याच्या दुखापतीमुळे पुन्हा संघाबाहेर झाला. अशावेळी अष्टपैलूच्या भूमिकेत तो दीर्घकाळ कायम राहू शकणार नसल्याचे ध्यानात येताच गुजरात व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असाही एक सूर उमटत आहे.
रोहित शर्मा अनभिज्ञमुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद लुटत आहे. हार्दिक पांड्या याला संघात घेणाऱ्या मुंबई आणि गुजरात टायटन्समधील ‘डील’ रोहितला माहीत नसावी. सर्व घडामोडींपासून तो अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे. २०२४ च्या पर्वात मुंबईचे नेतृत्व रोहित करेल की हार्दिक, याविषयीदेखील चर्चांना उधाण आले आहे.
गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिकने दोन सत्रांत शानदार कामगिरीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर त्याने आधीचा संघ ‘मुंबई इंडियन्स’मध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या निर्णयाचा सन्मान करीत भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो.- विक्रम सोळंकी, क्रिकेट संचालक, गुजरात टायटन्स
हार्दिकच्या घरवापसीचे स्वागत करताना आम्ही रोमांचित आहोत. आमच्या ‘मुंबई इंडियन्स’सोबतची ही सुखद पुनर्भेट आहे. ‘मुंबई इंडियन्स’चा युवा खेळाडू ते भारतीय संघाचा स्टार खेळाडू असा दीर्घ प्रवास हार्दिकने यशस्वीपणे केला. आम्ही त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या भविष्याबाबत उत्साही आहोत.- नीता अंबानी, मालकीण, मुंबई इंडियन्स
हार्दिकमुळे संतुलन...अष्टपैलू हार्दिक ज्या संघात असतो तो संघ संतुलित बनतो. ही सुखद घरवापसी ठरावी. मुंबई इंडियन्ससोबतची हार्दिकची पहिली इनिंग अत्यंत यशस्वी ठरली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये तो आणखी यशस्वी होईल, अशी खात्री आहे.- आकाश अंबानी