नवी दिल्ली - कांगारूंच्या विरोधात हॅटट्रीक घेतल्यापासून कुलदिप यादव चर्चेत आहे. पण त्याच्या या यशानंतरही कुलदीपचे प्रशिक्षक कपिल पांडे नाराज आहेत. रोमांचक झालेल्या कोलकाता वनडेमध्ये विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आणि याच कारणामुळे कुलदीपचे कोच नाराज आहेत.
कुलदीपच्या हॅटट्रीकमुळे भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे विराट कोहलीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुलदीपसोबत शेअर करायला हवा होता. कोहली संघातला सिनीयर खेळाडू आहे, त्यामुळे नवख्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुलदीपसोबत शेअर करायला हवा होता, असं कपिल पांडे डेक्कन क्रोनिकलसोबत बोलताना म्हणाले.
इडन गार्डन्सची खेळपट्टी नवीन होती आणि त्यावर फास्ट बॉलर्सना मदत मिळत होती. त्यामुळे अशा खेळपट्टीवर हॅटट्रीक मिळवणं खरोखरंच मोठं यश आहे, असं पांडे म्हणाले. सामना संपल्यानंतर त्याने मला फोन केला. त्यावेळी खेळपट्टीचा विचार न करता योग्य लाइन आणि लेंथवर गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला असंही त्यांनी सांगितलं.
या सामन्यात कुलदीप यादवने 33 व्या षटकात मॅथ्यू वेड (2), अॅश्टन अॅगर (0) और पॅट कमिन्स (0) यांना बाद करून आपली हॅटट्रीक पूर्ण केली होती. तर विराट कोहलीने फलंदाजी करताना 92 धावांची शानदार खेळी केली होती. पण तो आपलं 31 वं शतक झळकावण्यापासून अवघ्या 8 धावांनी चुकला. विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.